१३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास शिर्डीत प्रारंभ

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास शिर्डी येथे सुरुवात झाली.याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ,संमेलनाध्यक्ष ह.भ.प.संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प.माधव महाराज शिवणीकर,वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प चकोर महाराज बावीस्कर आदी उपस्थित होते. श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत संत साहित्य संमेलनाचे आयोजन ही जिल्हावासियांसाठी भाग्याची गोष्ट असल्याचे नमूद करत पालकमंत्री विखे पाटील म्हणाले,संत साहित्यातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला आहे. संताची भूमिका लोककल्याणाची होती.

मराठी भाषा व तिच्या बोली भाषांमध्येही संत साहित्याचे प्रतिबंब दिसून येते. संत साहित्य समाजाच्या उद्धारासाठी आहे. संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित होते. समाजाचे ऐक्य टिकविण्याची ताकद संत साहित्यात असल्याने प्रत्येकाने संत साहित्य वाचले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया मजबूत करण्याचे काम या साहित्यातून झाले आहे. संतानी समाज सुधारणेचा मंत्र आपल्याला दिला.संत साहित्याच्या माध्यमातून निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम झाले. ही परंपरा पुढे नेतांना लोकशिक्षण व लोकजागृतीचे काम अविरतपणे सुरू ठेवण्याचे काम संत आणि वारकरी निश्चित करतील,अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच याप्रसंगी रामदास आठवले म्हणाले की महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या विचारांचा वारसा घेऊन वारकरी काम करतात. माणसाचे कल्याण साधण्याचे आणि सुखदुःखासाठी जगण्याचा मंत्र देण्याचे काम वारकरी करतात. संत, वारकरी नसते तर समाज व्यवस्था टिकली नसती. माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे व समाज एकसंघ ठेवण्याचे काम संत, वारकऱ्यांनी केले. वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. समाजातील कुप्रवृत्ती बाजूला नष्ट करण्यासाठी संत, वारकऱ्यांनी समाजप्रबोधन व संस्काराचे काम प्रभावीपणे करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.यावेळी संजय शिरसाट म्हणाले की संत वारकऱ्यांकडून संस्कृती संवर्धनाचे कार्य केले संत आणि वारकरी हे संस्कृती टिकवण्याचे काम करतात.
वारकऱ्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक वारसा सामान्य जनांपर्यंत पोहोचतो, समाजातील सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होते. राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या समन्वयाने समाजात अनुकूल बदल घडवून आणण्याचे काम व्हायला हवे तसेच वारकरी साहित्य संमेलनास सामाजिक न्याय विभागाने २५ लाख रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. सर्व वारकरी दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांची शासनाकडून मदत दिली जाईल. संत साहित्य व वारकऱ्यांना आवश्यक सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच यावेळी संमेलनाध्यक्ष देहूकर म्हणाले, संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय हे मराठी संस्कृती आणि भक्ती परंपरेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. वारकरी संप्रदाय हा भगवान विट्ठलाच्या भक्तीवर आधारित असून, त्यात संतांनी रचलेले साहित्य हे भक्ती, ज्ञान व समाज प्रबोधनाचे माध्यम बनले आहे.यावेळी ह.भ.प माधव महाराज शिवणीकर व सदानंद मोरे यांचे देखील भाषणे झाली.सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विठ्ठल पाटील यांनी वारकरी संत साहित्य संमेलन आयोजनामागील भूमिका विशद केली.संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी, श्री.साईबाबा समाधी मंदीर ते संमेलनस्थळ शेती महामंडळ मैदानापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सांगता अश्व रिंगणाने करण्यात आली. दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचा समारोप २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनास राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी व संत अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.