Breaking
संजीवनी उद्योग समूह

गरिबीला हरवून जिद्दीने फडकावला यशाचा झेंडा, उषा पवार एमपीएससीत यशस्वी स्नेहलताताई कोल्हे यांनी केले अभिनंदन

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहरातील सुभाष नगर येथील कन्या उषा गंगाधर पवार हिने आपल्या चिकाटी, मेहनत आणि कुटुंबाच्या संघर्षाच्या बळावर एमपीएससी परीक्षेत यश मिळवत कोपरगावचं नाव उज्ज्वल केलं आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या उषाने आज स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं आयुष्य उजळून टाकलं आहे याबद्दल माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उषा पवार यांचे निवासस्थानी भेट देऊन सत्कार करत अभिनंदन केले आहे.लहान वयातच वडिलांचे सावली हरवल्यानंतर घराची जबाबदारी आई अहिल्याबाई पवार आणि भाऊ ज्ञानेश्वर पवार यांच्या खांद्यावर आली. आईने शहरातील सफाईचं काम करत घर चालवलं, तर भावाने रस्त्यांवर बूट पॉलिश करून बहिणीच्या शिक्षणासाठी पैसा जमवला. या दोघांच्या अथक प्रयत्नांनी आणि त्यागानेच उषाला शिक्षणाची गोडी मिळाली आणि तिने आपल्या प्रत्येक यशात त्यांच्या घामाचा आणि कष्टाचा सन्मान राखला.गुरुवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एमपीएससी निकालात उषा उत्तीर्ण झाल्याची बातमी पसरताच सुभाष नगर परिसरासह कोपरगाव शहरात आनंदाचा जल्लोष झाला. नागरिकांनी तिच्या घरी भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला.

कोल्हे ताई तुम्ही दुसऱ्यांदा आमच्या एवढ्याश्या घरात आलात आम्हाला खूप आनंद झाला.माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे साहेब यांनी देखील एक काळ आम्हाला खूप सहकार्य केले आहे तुम्ही आल्यानंतर आम्हाला त्यांची आठवण आज आली अशा शब्दात आई अहिल्याबाई पवार यांनी आपल्या भावना भावनिक शब्दात व्यक्त केल्या.

आपल्या या यशाबद्दल उषा म्हणाली, हे यश माझं नाही, माझ्या आईच्या घामाचं आणि भावाच्या कष्टाचं आहे. त्यांनी मला स्वप्न दाखवलं आणि मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. तिच्या या शब्दांतून तिच्या घरातील संघर्ष आणि कृतज्ञतेचा प्रत्यय येतो.माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उषा पवार यांची विशेष भेट घेऊन तिच्या जिद्दीचं कौतुक केलं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उषाने मिळवलेलं यश सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे. जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.उषा पवार यांनी केवळ अधिकारी पद मिळवलं नाही, तर गरीब आणि संघर्ष करणाऱ्या हजारो तरुणांसाठी प्रेरणेचं प्रतीक ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाने कोपरगावचा अभिमान उंचावला आहे आणि समाजातील प्रत्येक गरीब घराला नवी आशा दिली आहे असेही शेवटी कोल्हे म्हणाल्या. यावेळी कोपरगाव भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »