
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात प्रोत्साहन देणाऱ्या समता स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या संकल्पनेतील समता इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा कर्तृत्वाची शिखरे गाठली आहेत. शाळेतील विद्यार्थी साईश निलेश देवकर याची निवड प्रतिष्ठेच्या सीबीएसई क्लस्टर क्रिकेट साऊथ झोन-२ स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे.नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील तब्बल ७०० खेळाडू सहभागी झाले होते.

त्यातून काट्याच्या चुरशीच्या निवड प्रक्रियेतून फक्त १८ खेळाडूंची राष्ट्रीय संघासाठी निवड करण्यात आली. या निवडीत साईशने ठसा उमटवत सदन स्ट्रायकर्स या संघातून दिल्ली येथे होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा मान मिळवला आहे.साईशच्या यशामध्ये त्याला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक अजिंक्य बोबडे, सनी धिवर तसेच क्रीडा विभाग प्रमुख रोहित महाले यांचे मोलाचे योगदान आहे. साईश हा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक निलेश देवकर यांचा सुपुत्र आहे.शाळेचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य संधी आणि सक्षम मार्गदर्शन मिळाल्यास हे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकू शकतात.

साईशची निवड ही समता परिवाराच्या शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील बांधिलकीचे फलित आहे. आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न केला, तर तो नक्कीच यशस्वी होईल.कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी मत व्यक्त करताना म्हटले की,साईशचे यश म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असून भविष्यात तो नक्कीच राष्ट्रीय पातळीवर चमकणार यात शंका नाही. तर शाळेचे प्राचार्य समीर अत्तार म्हणाले,साईशची निवड ही आमच्या शाळेसाठी अभिमानास्पद बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.साईशच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.