जिल्हास्तरीय दांडिया नृत्य स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलचा ऐतिहासिक विजय

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या भव्य दांडिया नृत्य स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झळाळत्या कामगिरीची नोंद केली आहे. कोपरगावमधील शारदा इंग्लिश मिडियम स्कूल आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल १५ संघांनी सहभाग घेतला होता. अतिशय रंगतदार व अटीतटीच्या या स्पर्धेत समता शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करत विजयाची पताका फडकावली आणि शाळेचा मान उंचावला.
हा विजय फक्त एक क्रमांक नाही, तर विद्यार्थ्यांची चिकाटी, प्रयत्न आणि जिद्दीची साक्ष आहे. मुलांनो, स्वप्न मोठे ठेवा, मेहनत कधीही थांबवू नका आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जा. यश नक्कीच तुमच्या पावलांशी येईल!” अशा प्रेरणादायी शब्दांत समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या विजयामुळे कोपरगावात समता इंटरनॅशनल स्कूलचा नावलौकिक आणखी उजळला असून, विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत रुद्राणी गोसावी,अर्णव कुलकर्णी, ईशान कोयटे,जान्हवी भागवानी, अविका डंबीर, निष्ठा संकलेचा, साईशा देशपांडे, सृष्टी वक्ते, ऐश्वर्या माखिजा, राशी थवानी, राजवी मालपुरे, हित ओस्तवाल, श्रियांश सांगळे, मोहन लोंढे, सिद्धांत राजपूत, अर्णव आढाव आदींनी नृत्य कला प्रकारात कला सादर करत यश संपादन केले.स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि सादरीकरणातील अचूकतेला प्रेक्षक व परीक्षकांकडून दाद मिळाली. त्यांच्या या कामगिरीबद्दल बोलताना शाळेचे प्राचार्य समीर अत्तार यांनी “विद्यार्थ्यांच्या चिकाटी, सराव आणि समर्पणामुळे हा विजय शक्य झाला

असून, हे यश शिक्षकांच्या मार्गदर्शनाला व पालकांच्या पाठिंब्यालाही समर्पित आहे असे सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या विजयी संघाला नृत्य शिक्षक आदित्य सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राथमिक विभाग प्रमुख जिज्ञासा कुलकर्णी यांनी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. याशिवाय शिक्षक भक्ती बाभूळके, सुनंदा बिडवे, मंगेश गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य या यशामागे लाभले.समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्स्फूर्त आणि उज्ज्वल यश मिळवत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढविण्याची इच्छा समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांनी व्यक्त केली.