समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी व कर्ज वाटपात भरीव वाढ; तिमाही आढावा जाहीर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या तिमाही आर्थिक स्थितीचा आढावा नुकताच संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत जाहीर केला. यावेळी संस्थेच्या ठेवी आणि कर्ज वाटपात झालेली उल्लेखनीय वाढ स्पष्ट करण्यात आली.गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत संस्थेच्या ठेवीत तब्बल १४ टक्के, म्हणजे ३६ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ झाली असून १०७३ कोटी २४ लाख इतक्या ठेवी झाल्याची माहिती संचालक संदीप कोयटे यांनी दिली. ठेवीत झालेल्या या भरीव वाढीबरोबरच एकूण कर्ज वाटपामध्ये तीन महिन्यात ४१ कोटी २५ लाख रुपयांची वाढ झाली असून, संस्थेचे एकूण कर्ज वाटप ८०९ कोटी ७९ लाख इतके झाले आहे.विशेष बाब म्हणजे, गत तीन महिन्यात झालेल्या एकूण कर्ज वाटपापैकी ५४३ कोटी, म्हणजे ६७ टक्के कर्ज सोनेतारण स्वरूपातील असून, एकूण सोनेतारण कर्ज वाटपात गत तीन महिन्यात ४४ कोटी ३६ लाख रुपयांची वाढ झाली आहे. “सोनेतारण कर्ज हे जगातील सर्वात सुरक्षित कर्ज समजले जाते. तसेच संस्थेची विविध बँकांमधील गुंतवणूक २५७ कोटी ३८ लाख इतक्या रुपयांची असून मोबाईल बँकिंग, पेपरलेस बँकिंग, ऑडिट कंट्रोल रूम, सेल्फ बँकिंग प्रणाली, व्हाउचरलेस प्रणाली

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरामुळे संस्थेच्या समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.८८ ठेवीदारांच्या ५० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत,” असे संस्थेचे जेष्ठ संचालक जितूभाई शहा यांनी सांगितले.समता पतसंस्थेचे सोनेतारण कर्ज व्यवस्थापन हे ‘सुधन गोल्ड लोन’ या कंपनीमार्फत करण्यात येत असल्यामुळे या कर्ज प्रकारात सुरक्षिततेचा उच्च दर्जा प्राप्त झाला आहे. सुरक्षित कर्ज वाटप, कायदेशीर व कठोर वसुली व्यवस्था, तसेच सभासद व ठेवीदारांप्रती असलेली पारदर्शकता यामुळे समता पतसंस्थेवरील विश्वास दिवसेंदिवस बळकट होत असून संस्थेचे सभासद, ग्राहकांसाठी नव्याने ‘सहकार बास्केट’ ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले.या उल्लेखनीय आर्थिक प्रगतीबद्दल संस्थेचे व्हा. चेअरमन अरविंद पटेल यांनी सर्व सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांचे आभार मानले आहेत.