शिक्षकच भारताचा खरा शिल्पकार – डॉ.सर्जेराव निमसे,माजी कुलगुरू

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पूर्वीपेक्षा आजची शिक्षण व्यवस्था चांगली असली तरी शिक्षकांनी आपल्या पेशाची प्रतिष्ठा जपली पाहिजे. शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक कुतूहल निर्माण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतो. भारताची शिक्षण पद्धती जगात उच्च प्रकारची आहे.विकसित होण्याचा मार्ग शिक्षण व्यवस्थेतूनच जात असतो. आदर्श शिक्षक हाच असतो जो विद्यार्थ्यांना आदर्श घडवतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये व्यवसायाबद्दल अभिमान निर्माण करण्याचे कार्य शिक्षकच करत असतात. आज ए.आय.चे युग आले असले तरी मानवी मूल्ये शिक्षकच जपू शकतात,” अशा शब्दांत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोपरगाव शहरातील समता चॅरिटेबल ट्रस्ट व कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त आयोजित शिक्षक सन्मान सोहळा समता पतसंस्थेच्या समता सहकार सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते.“शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे. पालक मुलांना जन्म देतात,पण त्यांना संस्कार, ज्ञान व जगण्याची दिशा देण्याचे काम शिक्षक करतात. म्हणूनच शिक्षकांचे समाजात स्थान अतुलनीय आहे. आज समाज बदलत आहे, तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे, पण खरे परिवर्तन हे शिक्षकच घडवू शकतात. विद्यार्थी जर घडले तर देश आपोआप उज्वल होईल. समता पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि शिक्षकांचा सन्मान हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,

असे उदगार अध्यक्षीय मनोगतातून काका कोयटे यांनी काढले. या सोहळ्याचे प्रास्ताविक जेष्ठ महिला समिती अध्यक्षा रजनीताई गुजराथी यांनी केले. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या व्यक्तिमत्वाचे स्मरण करून “काका म्हणजे परीस आहेत, त्यांच्या सहवासात येणारा व्यक्ती सोने बनतो. त्यांनी समाजात चांगले अधिकारी घडवले आहेत,” असे मत व्यक्त केले. जेष्ठ नागरिक सेवा मंचाचे कार्याध्यक्ष विजय बंब यांनी मंचाच्या उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक सेवा मंचाचे अध्यक्ष सौ. सुधाभाभी ठोळे, उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, कार्याध्यक्ष विजय बंब, सचिव उत्तमभाई शहा, आश्विन व्यास, लेखिका शैलेजा रोहोम यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर अत्तार यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समताचे कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार समता पतसंस्थेचे ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी मानले.