कोपरगाव मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांची महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संगमनेर प्रदीप वट्टमवार व शहर विभागाचे उपकार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांनी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीत कोपरगाव मतदारसंघातील विविध गावांमध्ये तसेच शहर विभागात वारंवार खंडित होणारी वीज, कमी दाबाचा पुरवठा आणि नवीन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता या महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. कोल्हे यांनी स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.यावर कार्यकारी अभियंता वट्टमवार व उपअभियंता धांडे यांनी समस्यांचे गांभीर्य लक्षात घेतले असून, आवश्यक तांत्रिक उपाययोजना आखून लवकरच सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आश्वासन दिले.

त्यांनी वीज वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण, तांत्रिक दुरुस्ती तसेच आवश्यक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर व तारांबाबत तातडीने पावले उचलली जातील असे सांगितले.या चर्चेमुळे कोपरगाव मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांवर लवकरच ठोस तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानून लोकांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.