कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकरी मदतीपासून वंचित व काहीना तुटपुंजी मदत – सुरेश जाधव

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके, जनावरे, शेती साधनसामग्री यांचे अतोनात नुकसान झाले असताना, शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने योग्य आणि वेळेत पंचनामे करणे अपेक्षित होते. परंतु लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे आणि दुर्लक्षामुळे अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून अद्यापही वंचित आहेत, अशी तीव्र भावना प्रगतशील शेतकरी सुरेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.जाधव म्हणाले की, शासनाची भूमिका स्पष्ट आहे कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. तरीही कोपरगाव तालुक्यातील परिस्थिती अगदी उलट दिसते आहे. शेजारील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळाली असताना, कोपरगावात अनेक शेतकऱ्यांना अल्प रक्कम मिळाली तर काहींना अजूनही मदतीचा लाभ मिळालेला नाही. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाशी समन्वय साधून वेळेत बैठक घेऊन नियोजन केल्यास शेतकऱ्यांना अधिक न्याय मिळू शकला असता, परंतु नियोजनाच्या अभावामुळे आणि निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले, असे ते म्हणाले.शेतकऱ्यांचे दुःख समजून घेत सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक मदतीचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे ही त्यांची जबाबदारी आहे मात्र तरीही न्याय मिळाला नाही असे स्पष्ट केले. यापुढे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शासन आणि प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात व मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तसेच अल्प मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे सदर परिस्थितीचे निवेदन दिले आहे.पुन्हा तक्रार असणाऱ्या शेतकऱ्यांची वस्तुस्थितीची पाहणी करून नुकसान प्रमाणात मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केलेली आहे असेही शेवटी जाधव म्हणाले.




