मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शिखर समितीची बैठक संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
केंद्र सरकारच्या सूचनेवरून आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध सहकारी उपक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.या बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष काका कोयटे यांनी फेडरेशनच्या उपक्रमांची सविस्तर माहिती सादर केली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची सुरुवात होताच शिर्डी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषद, महाराष्ट्रभर सहकार दिंडीचे आयोजन, तसेच पुढील काही महिन्यांत अहमदपूर येथील सहकार मंत्र्यांच्या गावापासून ते नागपूर (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान) या मार्गावर सहकार ध्वज संचलन यात्रा आयोजित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना याबाबत त्यांनी तपशीलवार माहिती दिली.याशिवाय, बुलढाणा येथे पतसंस्थांच्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच ‘गाव तेथे सहकार चौक’ ही अभिनव संकल्पना सादर करून प्रत्येक गावात सहकाराचे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला.या सर्व उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी मनापासून स्वागत करत सहकार चळवळीच्या नव्या पर्वाची ही सुरुवात असून, राज्यातील सहकारी पतसंस्था आता आंतरराष्ट्रीय सहकार विचारांचे प्रतिनिधित्व करत असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली असल्याचे गौरवोद्गार देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

“सहकार खात्याने राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या या कार्यक्रमांसाठी आवश्यक सर्व सहकार्य व पाठबळ द्यावे,” असे स्पष्ट आदेश बैठकीत दिले.आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकारी पतसंस्थांच्या कायद्यात अमुलाग्र बदल करावे. सहकारी पतसंस्थाविषयीच्या कायद्यात बदल करताना राज्य सरकारच्या समितीत राज्य फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचा देखील विचार करण्यात यावा. तसेच राज्य फेडरेशनच्या सिबिल सारख्या क्रास प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार खात्याने सहकार्य करण्याची इच्छा राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी व्यक्त केली.तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या कंपन्यांच्या धरतीवर राज्य फेडरेशन देखील सहकार बास्केट ही नवीन संकल्पना सहकार क्षेत्रात रुजवत असून राज्य शासन व सहकार खात्याने देखील या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत सहकारी पतसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असून या उपक्रमाला सहकार खात्याने सहकार्य करण्याचे आवाहन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.या बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार आयुक्त दिपक तावरे, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे आणि विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.