ज्येष्ठांचा उत्साह पाहून शहर भारावले– समता पतसंस्थेच्या जलद चालणे स्पर्धेत १८० ज्येष्ठांचा सहभाग

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
समता नागरी सहकारी पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल व कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांसाठी जलद चालणे स्पर्धा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते समता नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यालय या मार्गावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ६५ ते ७५ व ७५ वर्षांवरील अशा दोन गटांत विभागणी करून एकूण १८० ज्येष्ठ महिला व पुरुष सहभागी झाले होते.
जलद चालणे हा एक व्यायामाचा प्रकार आहे. चालल्याने आरोग्य सुधारते, ज्येष्ठ नागरिकांचा एकमेकांशी सुसंवाद वाढतो व भेटीगाठी होतात. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेतून ज्येष्ठांमध्ये नवचैतन्य व उत्साह दिसून येत होता. त्यांचा आनंद व सहभाग हा वाखाणण्याजोगा होता. हेच या स्पर्धेचे यश आहे.- ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, चेअरमन, समता पत संस्था.
स्पर्धेचे उद्घाटन समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, व्हा.चेअरमन अरविंद पटेल, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब, सचिव उत्तम भाई शहा, तसेच ज्येष्ठ महिला समिती अध्यक्षा श्रीमती रजनीताई गुजराथी यांच्या हस्ते झाले.बक्षीस वितरण समारंभ समता सहकार सभागृहात पार पडला. ९८ वर्षीय ज्येष्ठ गोपीनाथ महाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास ज्येष्ठ नागरिक सेवा मंच उपाध्यक्ष ९७ वर्षीय दत्तात्रय कंगले, ९६ वर्षीय दशरथ वहाडणे यांच्यासह श्रीमती शोभा ठोळे, रंजना आढाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी स्व.भागचंद माणिकचंद ठोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ट्रॉफी विजेत्यांना देण्यात आली.या स्पर्धेत ६५ ते ७५ वयोगट पुरुषांमध्ये वसंत भावसार (प्रथम), अशोक चौधरी (द्वितीय), प्रदीप पदे (तृतीय), ७५ वर्षांवरील गटात दिनकर झावरे (प्रथम), चांगदेव घुमरे (द्वितीय), छबूराव नजन (तृतीय), ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिलांमध्ये शशिकला देशमुख (प्रथम), लहानुबाई खंडिझोड (द्वितीय), हिराबाई दवंगे (तृतीय) पटकावत बक्षीस मिळविली.

याशिवाय प्रत्येक गटात ८ उत्तेजनार्थ बक्षिसे देखील देण्यात आली.विजेत्यांच्यावतीने मनोगत व्यक्त करताना दिनकर झावरे म्हणाले,काका कोयटे व समता पतसंस्था नेहमीच ज्येष्ठांसाठी स्तुत्य उपक्रम राबवते. ठेवींवर आकर्षक व्याजदर, आरोग्य व आनंदी जीवनासाठी विविध व्याख्याने आयोजित केली जातात. जलद चालणे स्पर्धेमुळे आम्हाला व्यायामाची सवय लागते व आरोग्य सुधारते.

भविष्यात अशा आणखी स्पर्धा व्हाव्यात, आम्ही नेहमी सहभागी होऊ.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे डॉ.विलास आचारी यांनी केले. सुत्रसंचालन समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर अत्तार यांनी केले तर आभार प्रदर्शन ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समता पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल व ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.