सहकाराच्या प्रवासाला दिशा देणारा क्षण – उपमुख्यमंत्री अजित पवार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला आणि त्यामुळे महाराष्ट्राचा देशातल्या सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळाली, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला. तर देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांनी साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. म्हणून सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील या सहकार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणे हा दुग्ध शर्करा योग आहे.

सहकाराच्या प्रवासाला एक नवीन दिशा देणारा हा एक महत्वाचा क्षण आहे, सहकाराच्या शतकातले एक सुवर्ण पान आहे.शेतकऱ्याला आपली ताकद
ओळखायला लावायची आणि सहकारच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं या विचारातूनच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला. हा केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. आज या कारखान्याची क्षमता वाढत असताना शेतकऱ्यांनाही नवे तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादन वाढवावे लागेल. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली, त्यांच्या मदतीने शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी बरोबरच सरस्वती देखील नांदू लागली.

सहकार चळवळ अडचणीत येत असताना केंद्र सरकारने ‘सहकारातून समृद्धी’ ही संकल्पना व्यवहारात आणली. मोलायसिसवरील कर २८ टक्क्यावरून ५ टक्क्यावर आणण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील संस्थानमुळे राज्याच्या सहकार क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे, असे पवार म्हणाले. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल,शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असेही ते शेवटी म्हणाले.या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. सहकारमंत्री प्रवरानगर मध्ये दुसऱ्यांदा येत आहेत.

देशातील पहिल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी ते सक्षमपणे सांभाळत आहेत. केंद्र शासनाच्यावतीने सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम केले जात आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनींच्या नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे काम राज्य शासन करत आहे. येत्या काळात राज्य निश्चितच दुष्काळमुक्त होईल. सहकार चळवळीच्या विचारांशी कधीही प्रतारणा होऊ दिली जाणार नाही.प्रवरा उद्योग समूहाच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.याप्रसंगी आमदार रविंद्र चव्हाण,शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे,अमोल खताळ,आशुतोष काळे, किरण लहामटे, विक्रम पाचपुते,विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते,प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.