सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला : केंद्रीय मंत्री अमित शाह

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सहकार क्षेत्रात सी.एन.जी व पोटॅश निर्मितीच्या माध्यमातून व त्याची विक्री व्यवस्था करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला आहे. याच पद्धतीने देशात १५ सहकारी साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचे युनिट उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्रातील अधिकाधिक कारखान्यांचा त्यात सहभाग असेल, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. केंद्र सरकार निश्चितपणे त्यांना सहकार्य करेल असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना येथे देशातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी.) प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचे उद्घाटन झाले.

त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. स्वदेशीच्या वापरातून देशाला स्वयंपूर्ण करण्याचे व देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पहिल्या तीन क्रमांकात आणण्याचे उद्दिष्ट आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने याची सुरुवात केली आहे. याचप्रमाणे इतर कारखान्यांनी पुढे येण्याची गरज आहे.इथेनॉल प्रकल्प आता बहुआयामी करण्याची आवश्यकता आहे. सहकारी साखर कारखान्यांनी चक्रीय अर्थव्यवस्था स्वीकारली पाहिजे. फळांच्या रसापासून इथेनॉल निर्मितीकडेही लक्ष दिले पाहिजे. फळांचे प्रोसेसिंग येथे झाले तर साखर कारखाने नफ्यात राहतील, असे त्यांनी नमूद केले.तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने हरित ऊर्जेसाठी काम केले आहे. प्राथमिक क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून बळकटीकरण, महिला बचत गटांचे जाळे अशा माध्यमातून संजीवनी उद्योग समूहाने वाटचाल सुरू ठेवली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम या माध्यमातून होत आहे तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कायम शेतकऱ्यांप्रती आत्मीयता दाखवली आहे. त्यामुळे एन सी डी सी च्या माध्यमातून १५ साखर कारखान्यांना केंद्र सरकारने मदत केली.

देशामध्ये डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता साधण्यासाठी केंद्र सरकारने ‘दलहन आत्मनिर्भरता मिशन’ सुरू केले. त्यासाठी पुढील सहा वर्षांसाठी ११ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच नाफेड व एनसीसीएफकडे नोंदणी असलेल्या खरेदी केंद्रावर किमान आधारभूत किमतीनुसार पिकांची खरेदी केली जाणार आहे. तसेच केंद्र सरकारने मसूर, मूग, मोहरी, हरभरा, तुरी सह ज्वारी, सोयाबीन, कापूस व गहू यांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय एक हजार प्रोसेसिंग युनिट स्थापन करून ३८ लाख शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे किट वितरीत करण्यात येतील. शेतकऱ्यांना याचा खऱ्या अर्थाने लाभ होईल असेही अमित शाह शेवटी म्हणाले.