नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्याचा दुष्काळ दूर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची चळवळ रुजवली आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी जल नियोजनाच्या संदर्भात महाराष्ट्रात जागृती घडवून आणली. या दोघांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण हे ‘पद्मस्मरण’ आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखान्याने १० हजार टीपीडीपर्यंत आता मजल मारली आहे.ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. या क्षेत्राच्या विकासाचे श्रेय डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांना जाते. त्यांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे उभा राहिला. महाराष्ट्रामध्ये ज्या-ज्या भागात सहकार चळवळ पोहोचली, सहकारी साखर कारखाने पोहोचले, तिथला शेतकरी समाधानी झाला आणि त्या ठिकाणचे औद्योगीकरणदेखील चांगल्या प्रकारे झाले, इथला शेतकरी संपन्न झाला.

पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळ पुढे नेण्यासोबत जलसंवर्धन चळवळ महाराष्ट्रात रुजविण्याचे कार्य केले. राज्य शासनाने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्याचा आणि त्यातून राज्यातील दुष्काळ दूर करण्याचा निश्चय केला आहे. विदर्भामध्ये वैनगंगा – नळगंगा,तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणायचं काम, उल्हास खोऱ्यातले समुद्रात वाहून जाणारे ५४ टीएमसी पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पुढच्या पाच ते सात वर्षात टप्प्या टप्प्यानं हे संपूर्ण पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर नाशिक, अहिल्यानगर परिसर आणि मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ असेल असे कार्य राज्य शासन करेल,असे मुख्यमंत्री विश्वासाने म्हणाले.

प्रधानमंत्री मोदी यांनी पहिल्यांदा सहकाराचे महत्त्व समजून घेतलं आणि स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले आणि सहकारातला
कार्यकर्ता म्हणून पहिले सहकार मंत्री म्हणून अमितभाई शाह यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. सहकारमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी वेगाने निर्णय घेऊन या क्षेत्रातील धु्रिणींना चकित केले. राज्यातल्या सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ८ ते १० हजार कोटींची मदत देण्यात आली. सहकार चळवळ रुजविण्याचे कार्य केंद्र सरकारच्या चांगल्या निर्णयाने होत आहे.साखर कारखान्याच्या सर्क्यूलर इकॉनॉमी विकसित करण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. साखर कारखान्याचा मालक शेतकरी आहे, म्हणून त्याच्या पाठीशी शासन उभे राहील,अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.तसेच शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत असून लवकरच भरीव मदत करण्यात येईल यात केंद्र सरकारचेही सहकार्य मिळेल असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.