एसीबीने तलाठ्याच्या पंटरला पकडले मात्र तलाठी फरार कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्याच्या बदल्यात वीस हजाराची लाचेची मागणी काेपरगाव तालुक्यातील धारणगावच्या तलाठ्याने केली. वीस हजार रूपयांची लाच घेतांना खाजगी एजंटला लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र.९९/२०२५ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७,७(अ),१२ प्रमाणे पहाटे ०५:५६ वा लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास लाच लुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे या करत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की कोळपेवाडी येथील वाळू व्यावसाईकाला धारणगाव येथील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूची ट्रॅक्टरद्वारे वाहतुक करण्यासाठी तलाठी धनंजय गुलाब पऱ्हाड (वय ३५) याने वीस हजार रूपयांची मागणी केली. त्यानंतर वाळू व्यावसायिकाने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा तलाठी पऱ्हाड याने स्वत:साठी १० हजार व मंडळ अधिकारी पोकळे यांच्यासाठी १० हजार अशी एकुण वीस हजार रूपयांची मागणी केली. दि. ६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सापळा रचण्यात आला. कोपरगाव शहरातील बसस्टँड जवळ तलाठी पऱ्हाड यांच्या सांगण्यावरून सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी (वय २७, रा. धारणगाव) याने स्विकारली. पंचासमक्ष लाच स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.आपला एजंट पकडल्या गेला असल्याची माहिती मिळताच, तलाठी धनंजय पऱ्हाड फरार झाला आहे. याप्रकरणी तक्रारदार वाळु व्यावसायिकाने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शुक्रवार दि. ७ मार्च रोजी सकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून तलाठी धनंजय पऱ्हाड व सागर चौधरी याच्या विरूद्ध भष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ७, ७ (अ), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक छाया देवरे या करीत आहेत.