आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

आ.आशुतोष काळे व चैतालीताई काळे यांच्यासह हजारो भीम सैनिकांनी धरला भीम गीतांवर ठेका

0 5 3 7 2 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच, सोबतीला महाराष्ट्राचा महाआवाज गायक-संगीतकार आदर्श शिंदे, हजारो रसिकांनी भरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, एका मागोमाग भीम गीतांची पेशकश व त्या गाण्यांना मिळणारा टाळ्यांचा कडकडाट अशा बेधुंद वातावरणात आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून रविवार दि.२१ एप्रिल २०२४ रोजी संगीतमय संध्याकाळ भीम अनुयांयासाठी व रसिकांसाठी अक्षरक्ष: मेजवानी ठरली. यावेळी आ. आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी सौ.चैतालीताई काळे यांच्यासह उपस्थित हजारो भीम सैनिकांनी आदर्श शिंदे यांच्या गाण्यावर ठेका धरला निमित्त होते ‘आदर्श शिंदे नाईट’ कार्यक्रमाचे.

काळे परिवाराचा आदर्श, परिवाराची शिकवण व समर्थ वारसा पुढे घेवून जाणारे आ.आशुतोष काळे हे समाजातील प्रत्येक घटकांचे ऐकतात भलेही ती व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची, समाजाची असो त्यांच्यासाठी सर्व समान आहेत. त्यामुळे युवा भीम अनुयायांच्या मागणीनुसार ‘आदर्श शिंदे नाईट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.भीम गीतातून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्वितीय समाजकार्याची उजळणी होत असून त्याच बरोबर समाज प्रबोधन होवून समाजात सकारात्मक बदल घडण्यास मोठी मदत होणार आहे त्या माध्यमातून कोपरगावचे सांस्कृतिक व्यासपीठ देखील जिवंत राहणार आहे. -सौ.चैतालीताई काळे.

महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला असून संगीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संगीत क्षेत्रात महाराष्ट्रातील अनेक घराण्यांना लोकसंगीतचा वारसा लाभला आहे त्यापैकी एक घराणे म्हणजे शिंदे घराणे ज्या घराण्याचे नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट आहे. शिंदे परिवाराने गायलेली भक्ती गीते, भीम गीते, लोक गीते आजही तेवढीच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत.या घराण्याच्या तब्बल पाच पिढ्या गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. या घराण्याने संगीत क्षेत्राची सेवा करतांना कव्वाली, पारंपरिक गाणी, भारुड, गोंधळ, प्रेम गीते, चित्रपट गीते गाऊन संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली आहे. लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे कुटुंबाचा महाराष्ट्रातच नाही तर सर्व देशभरात चाहतावर्ग आहे. त्यांचा वारसा महाराष्ट्राचा महाआवाज गायक संगीतकार आदर्श शिंदे पुढे चालवीत असून त्यांनी लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून आजच्या पिढीला देखील लोकसंगीतावर ताल धरायला भाग पाडले आहे.

जाहिरात
जाहिरात

याच शिंदे घराण्याच्या संगीत प्रवासाचा आस्वाद घेण्याची दुर्मिळ संधी भीम गीतांच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील बाबासाहेबांच्या अनुयायांना ‘आदर्श शिंदे नाईट’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आ.आशुतोष काळे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उपलब्ध करून दिली होती. यावेळी मैदानावर प्रेक्षकांनी एवढी गर्दी केली होती की, पाय ठेवायला देखील जागा नव्हती. नागरिकांनी अक्षरक्ष: इमारतीच्या गच्चीवर जावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेताच डोळ्यासमोर एक उच्चशिक्षित, कणखर व जिद्दी व्यक्तिमत्व उभे रहाते. बाबासाहेबांची शिक्षणावर नितांत श्रद्धा होती. बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत विदेशात जाऊन शिक्षण घेत अनेक पदव्या मिळविल्या.

तोच आदर्श डोळ्यसमोर ठेवून अनुकूल परिस्थितीचा लाभ घेवून मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाने कमीत कमी एक तरी पदवी घेतली तरच आपण बाबासाहेबांचे खरे अनुयायी होवू शकतो.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने आपल्याला आपले अधिकार तर मिळाले परंतु त्याचबरोबर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली समता, स्वातंत्र्य व बंधुता हि मूल्य आचरणात आणण्याची गरज आहे.मी प्रथमतः व अंततः भारतीय आहे. जात-धर्म, पुरुष, स्त्री ह्या गोष्टी न बघता सर्वात आधी मी ह्या भारत देशाचा नागरिक असून आपण सर्व समान आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनात ज्यावेळी रुजली जाईल त्याच वेळी बाबासाहेबांना अपेक्षित असणारी समता प्रस्थापित झाली असे म्हणता येईल. देशातील प्रत्येक नागरिक एकमेकांशी बंधुभावाने वागला तर आपल्या भारतमातेच्या मातीत एवढी ताकद आहे की, आपला देश प्रत्येक बाबतीत जगात एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही व त्याचवेळी बाबासाहेबांच्या स्वप्नातला विकसित भारत घडेल.

त्यासाठी सर्वत्र समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे सर्व महापुरुष माझी प्रेरणास्थानं असून मतदार संघातील जनता माझी खरी शक्ती आहे. त्यामुळे मतदार संघातील अधिकच्या विकासासाठी आपले आशीर्वाद सदैव पाठीशी ठेवा यापेक्षा मोठा विकासाचा पल्ला गाठू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
‘आदर्श शिंदे नाईट’ या कार्यक्रमाची सुरुवात आदर्श शिंदे यांनी ‘सोनियाची उगवली सकाळ’ या सुप्रसिद्ध भीम गीताने केली. त्यानंतर अनेक भीम गीतांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली. आदर्श शिंदे यांनी त्याचे गाजलेले

‘राजा राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला’ आणि ‘नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाय नोटाला’ ‘ओ भावा, माझा जयभीम घ्यावा’ अशी अनेक गाजलेली गाणी गाऊन हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने ‘आदर्श शिंदे नाईट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदें परिवाराचा गायन-संगीत क्षेत्रातील आजवरचा संगीतमय प्रवास प्रेक्षकांना याची देही, याची डोळा अनुभवयास मिळाला.त्याबद्ल हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भीम अनुयायांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे