नगर-मनमाड महामार्ग येवला नाका परिसरात तातडीने दुरुस्ती करा – बिपीनदादा कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
नगर मनमाड महामार्गाची अवस्था गेले अनेक वर्षापासून अतीशय बिकट बनली आहे.सातत्याने अपघाताचे केंद्र ठरणाऱ्या महामार्गावरील कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरातील खड्डे नवीन वर्षाच्या तोंडावर प्रवाशांना त्रासदायक ठरत असून ते तातडीने बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन नागरिक छेडतील असा इशारा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिला आहे.
नगर मनमाड महामार्गा वरती मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते.अतिशय वाईट आणि दुर्दैवी अवस्था या मार्गाची झाली आहे.एस. एस.जी.एम महाविद्यालयाच्या परिसरात महामार्गावर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ रोज आहे.याच परिसरात जनावरांसाठी चाऱ्याचा लिलाव हायवेच्या कडेला होतो.

रस्त्याच्या मध्यभागी व दुतर्फा पडलेल्या चाकोऱ्यामुळे आणि दयनीय झालेल्या अवस्थेमुळे विद्यार्थ्यांनी विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे आपली व्यथा मांडल्यानंतर रस्ता दुरुस्ती संदर्भात वारंवार त्यांनी प्रशासनाला हा प्रश्न निदर्शनास आणून दिला आहे.विद्यार्थांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागणे कठीण बनले आहे.
स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून नागरिकांना संकटातून प्रवास करण्यास भाग पाडू नये.अनेक नागरिकांनी समस्या वारंवार मांडली असून सातत्याने होणाऱ्या अपघाताने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो आहे असे चित्र या महामार्गाचे बनले आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तातडीने सदर डागडुजी होणे गरजेचे असून नागरिकांना हानी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी बिपीनदादा कोल्हे यांनी केली आहे.