एस.एस.जी.एम. महाविद्यालयामध्ये आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी कार्यशाळेचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सद्गुरू गंगागीर महाराज संस्थेच्या गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे पुणे विद्यापीठ आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धा २०२५-२६ साठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमापूजनाने झाली. सदर कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी अध्यक्षीय पद स्वीकारले. याप्रसंगी मागील वर्षी आविष्कार संशोधन स्पर्धेत राज्यपारितोषिक विजेती विद्यार्थिनी कु. दिव्या रासकर हिने आपले अनुभव कथन केले. त्यात प्रामुख्याने संशोधक विद्यार्थ्याने संभाषण, वर्तवणूक, सादरीकरणाचा कालावधी, पेटंट नोंदणी या विषयी मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर या वर्षी आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी कु. लुटे मयुरी व चि. वाणी अजिंक्य यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी विविध कलागुणांबरोबरच संशोधनवृत्ती महत्त्वाची असल्याने कल्पना सुचणे ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. या कलागुणांना वाव देण्याचे काम शिक्षक व प्राध्यापक करत असतात. आयुष्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर संशोधन महत्त्वाचे असते त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संशोधन स्पर्धेत सहभाग नोंदवावा. अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी डॉ. देविदास रणधीर मानवविज्ञान,भाषा व कला शाखा यामधील संशोधन प्रकल्प, डॉ. अर्जुन भागवत यांनी वाणिज्य, कायदा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधन, डॉ. निलेश मालपुरे यांनी सैद्धांतिक विज्ञान, कृषी आणि पशुपालन या विषयावर, डॉ. घन:श्याम भगत यांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयावर व डॉ. प्रतिभा रांधवणे यांनी वैद्यकीय चिकित्सा आणि औषधनिर्माण शास्त्र या विषयांतील संशोधनाचे स्वरूप व विद्यार्थ्यांच्या प्रकल्पातील अभिप्राय सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व स्पर्धेमागील हेतू प्रा. डॉ. विलास गाडे यांनी स्पष्ट केला. सदर वर्गासाठी महाविद्यालयातील, प्राध्यापक व आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस.आर. दाभाडे व प्रा. प्रियांका पवार यांनी केले तर आभार प्रा. प्रतीक्षा रोहोम यांनी मानले.