महाविद्यालये ही कायदा शिकवणारी एक संस्थाच आहे – जिल्हा न्यायाधीश डी.डी.आलमले

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज मध्ये कायदा जाणीव जागृती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी न्यायाधीश डी.डी. आलमले मार्गदर्शन करतांना म्हणाले की प्रत्येकाला संघर्ष करूनच पद मिळते त्यापदाचा सन्मान करावा.विद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असतांना रयत एक अभ्यासक्रमांचा पाठ होता, तेव्हापासून मला रयत शिक्षण संस्थेचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डी.डी.आलमले यांनी केले.ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’,’महिला मंच’, ‘ग्रीव्हन्स रीड्रेसल सेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने व ‘विधी सेवा समिती’ च्या सहकार्याने आयोजित ‘कायदा जाणीव जागृती’ कार्यशाळे प्रसंगी बोलत होते. न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, “न्यायाधीश म्हणून मला रोज नव्या विषयांची जाणीव होते आजच्या काळात विद्यार्थ्यांना सन्मार्गाला लावण्याचे काम महाविद्यालय प्रशासन करते. आपणही नियमांचे पालन करावे. सुशिक्षित होणे पुरेसे नसून सुसंस्कृत होणे आवश्यक आहे. माझ्यासारखे तुम्हीही मोठे पद प्राप्त करावे.अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तसेच याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभलेले सहदिवाणी न्यायाधीश एम. पी.बिहारे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “विद्यार्थी वय हे अखंड ऊर्जेचे वय आहे. विद्यार्थी दशेत असताना स्वत:मधील परिपक्वता आजकाल वयाने येत नसून ती अभ्यासाने मिळवावी लागते.आपल्याकडे आईवडील,शिक्षक हे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात पण ते आपल्याला कळत नाही.प्रत्येकाकडे काहीतरी परिपूर्ण गुण आहेत. त्या गुणांचा व्यवसाय,नोकरीत उपयोग करून घ्यावा. कोणत्याही चुकीच्या वर्तनाला बळी पडू नका. आपले कॉलेज उत्तम शिक्षण देत आहे हे त्यांच्या उच्च मानंकनावरून समजते आहे. ज्या महाविद्यालयात सर्व घटकांना सामावून कार्य करवून घेतले जाते तो उत्तम प्रशासक असतो आपले महाविद्यालयही त्याच गुणवत्तेचे आहे.

असे सांगून त्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनाचा गौरव केला.याप्रसंगी सरकारी वकील ॲड.ए.एल.वहाडणे म्हणाले की “मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कायदा आवश्यक असतो, जन्म-मृत्यूचा दाखला ही त्याची प्रत्यक्ष उदाहरणे आहे. त्याचबरोबर ॲड.अशोक टूपके यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली की “महाविद्यालयात असणाऱ्या तक्रार निवारण समितीची स्थापना महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना न्यायालयाचे कामकाज प्रत्यक्ष दाखवणे हे सुद्धा गरजेचे आहे, चित्रपटातून केलेले चित्रण काल्पनिक असते. कायद्याचे ज्ञान ज्या व्यक्तीला आहे तो व्यक्ती अन्यायाचा विरोध करतो. आज रोजी भारतात ८९१ कायदे आहेत. त्यातील ‘ग्राहक कायदा’, ‘जन्म-मृत्यू विषयक कायदा’, ‘महिला संरक्षण कायदा’, ‘पोटगी कायदा’, ‘२००५ चा हिंदू वारसा कायदा’, ‘अँटी रॅगिंग’, ‘वाहतूक कायदा,’ ‘जमीन महसूल कायदा’, हे त्यातील उल्लेखनीय कायदे आहे.
महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ॲड.संदीप वर्पे यांनी अध्यक्षीय भाषणात, “कायद्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.”असे सूचक विधान केले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी केले. प्राचार्यांनी आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात, “कायदा जनजागृती विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. कायदा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडित असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माहिती अधिकार, सायबर क्राईम, महिला विषयी कायदे माहीत असणे गरजेचे आहे.” असे सांगितले. कार्यशाळेतील पाहुण्यांचा परिचय डॉ.उज्ज्वला भोर यांनी करून दिला. या कार्यशाळे साठी महाविद्यालयातील विविध विषयांचे प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा दाभाडे व प्रा.प्रियंका पवार यांनी केले.तर आभार प्रा.डॉ. सीमा दाभाडे यांनी मानले.