डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सरकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड हे समाजभिमूख प्रतिष्ठान असून सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने व मानव जातीच्या कल्याणार्थ विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करीत असते. यामध्ये स्वच्छता अभियान, साक्षरता अभियान,आरोग्य शिबीर,वृक्षारोपण व संवर्धन,तसेच रक्तदान शिबीर, जलपुनर्भरण, नोकरी तथा व्यवसाय मार्गदर्शन असे अनेक समाजोपयोगी व प्रबोधन पर उपक्रम नेहमीच प्रतिष्ठान राबवत आहे.
प्रतिष्ठानच्या हया कार्याची दखल शासनाने वेळोवेळी घेतली असून प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.श्री.आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांना “पद्मश्री” किताब देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच पदमश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी समाजामध्ये स्वच्छते बद्दल व आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रतिष्ठान तर्फे कोपरगाव शहरातील बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना, तसेच पोस्ट कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत पुढील काळामध्ये शहरातील सरकारी कार्यालये मुख्य रस्ते यांची स्वच्छता देखील करण्यात येणार आहे. आज झालेल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये कोपरगाव शहरातील अनेक नागरिकांनी स्व:इच्छेने या स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून हाती घेतलेले स्वच्छतेचे काम यशस्वी केले त्याबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांनी या स्वच्छते मोहिमेचे कौतुक केले आहे असेच कार्य प्रतिष्ठानने पुढे चालू ठेवावे अशी देखील सूचना वजा मागणी केली आहे.