महाराष्ट्र

तत्वनिष्ठ वाटेवर “जिद्द” प्रवास.- शंकरराव (मामा) आढाव पाटील

0 5 3 4 1 9

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

आपली मेहनत आणि कामावर निष्ठा ठेवून आदर्श जीवन तत्वांवर नितांत श्रद्धा काही व्यक्तीमत्व ठेवतात. सार्वजनिक जीवनात तत्व अन् शब्दाला जागणारी माणसं समाजात फार कमी असतात. असचं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अँड.शंकरमामा आढाव…गोदावरी तीरावर वसलेले कोपरगावात मुळ घराण्यांपैकी “आढाव” हे जुने घराणे आहे. गावगाड्यातील शेतकरी कुटुंबातील सखाराम पाटील आढाव हे मोठे नांव…खडकी परिसरातील सखाराम पाटील आढाव यांच्या वस्तीवर भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचा तळ होता. या तळाकडे स्वातंत्र्यसैनिक एक मुक्काम म्हणून पाहत असत. संयुक्त भारतातील दूरदूरचे स्वातंत्र्यसैनिक एकमेकांना येथे भेटत आणि विचारांची देवाणघेवाण करत असे. शेती सांभाळून स्वातंत्र्य सैनिकांना सहकार्य करणे ही भावना त्यांचेत दृढ होती. सखाराम पाटील आढाव यांचे जीवन कार्यावर आधारित रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष अँड. रावसाहेब शिंदे यांनी “भावलेली माणसं” हे पुस्तक लिहिले आहे.सखाराम पाटील आढाव यांना चार मुलं आणि चार मुली… अँड. शंकरराव, डॉ. शांताराम, डॉ. शिरिष आणि शिवाजीराव अशी मुले तर हिराबाई सूर्यभान आठरे (कोपरगाव), इंदूबाई सोपानराव जाधव (शहा-कारवाडी), रेणुकाताई रामकृष्ण महाले (कोपरगाव), सिंधूताई किसनराव घुमरे (पुणे) या चार मुली…या भावंडातील शंकरराव आढाव यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४० रोजी झाला.

वडील सखाराम पाटील हे शेतकरी तर आई देवूबाई या पती आणि कुटुंब संगोपन सोबत १०० एकर शेती सांभाळत होत्या. लहानपणापासून शंकरराव यांना शिक्षणाची आवड होती. त्यांचे शालेय शिक्षण श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथे झाले. त्यांचे आवडते शिक्षक हडपे सर यांनी त्यांना ज्ञानाचे बाळकडू दिले. पुढे पुणे येथे उच्च शिक्षणात फर्ग्युसन कॉलेज येथुन बी.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर आय.एल.एस. महाविद्यालय पुणे येथे कायद्याची पदवी संपादन केली.शालेय शिक्षणात मदन गुजराती, गणपतराव गवारे पाटील सह अनेक शंकरमामांचे बालपणापासूनचे मित्र. तर पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेतांना अँड. गोविंदराव आदिक (माजी खासदार), अँड. दौलतराव पवार (माजी आमदार), अँड. संपतराव कडू (माजी चेअरमन पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना आणि माजी आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचे वडील), अँड. बाजीराव कावळे (माजी चेअरमन कादवा सहकारी साखर कारखाना जि. नासिक), अँड. आरडे पाटील (माजी चेअरमन, जगदंबा सहकारी साखर कारखाना, राशीन), अँड. उत्तमराव ढिकले ( माजी खासदार आणि माजी चेअरमन नाशिक सहकारी साखर कारखाना ) हे होस्टेलचे सहकारी मित्र होते.अँड. शंकरराव यांचे कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर कोपरगाव येथे परतले. कोपरगाव तालुक्यात विधि क्षेत्रात अँड. सूर्यभान आठरे यांचा नावलौकिक होता.

अँड. शंकरराव यांनी १९६६ सालापासून वकिली व्यवसायाला आठरे वकीलांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली. वकिली व्यवसाय सुरु असतांना कोपरगाव सहकारी साखर कारखाना निमित्ताने शंकररावजी काळे त्यांच्या सहवासात आले. कायदेशीर अभ्यासपुर्ण ज्ञानाची मदत कोपरगांव सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीत झाली.या सर्वांची पावती म्हणून पुढे शंकरमामा कोसाकाचे संचालक झाले. त्या काळात कारभारी जाधव, सुधाकर आवारे, छबुराव आव्हाड, आप्पासाहेब होन, शंकरराव आढाव ही पाच व्यक्तीमत्वे शंकररावजी काळे साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जात. काळे साहेबांच्या सुविद्य पत्नी सुशिलामाई काळे ह्या पाच सहकाऱ्यांना “पांडव’ म्हणून संबोधत असे.कोसाका उद्योग समूहाच्या कुकूटपालन, गोदावरी खोरे केन, पेपर मिल, गौतम पब्लिक स्कूल यासह विविध संस्थांवर सलग २५ वर्षे अँड.शंकरराव आढाव यांनी कायदेशीर तज्ञ सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.कोपरगांव साखर कारखान्यामध्ये शंकररावजी काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या संचालक मंडळात फूट पडली आणि शंकररावजी कोल्हे साहेब यांनी स्वतंत्रपणे पॅनल तयार केला. या पॅनल मध्ये तुम्ही या…. तुम्हाला कारखान्याचे चेअरमन करतो. अशी शंकररावजी कोल्हे साहेबांनी अँड. शंकरराव आढाव यांना संधी देऊ केली. परंतू शंकररावजी काळे साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. या भावनेतून जगणारे अँड. शंकरमामा यांनी अतिशय अतिशय नम्रपणे शंकररावजी कोल्हे साहेबांना नकार दिला…

शेवटपर्यंत काळे साहेबांचे सहकारातील सोबती म्हणून सोबत राहण्याचा मनोदय व्यक्त केला.अँड. शंकरमामा यांचे माजी आमदार के. बी. रोहमारे, कर्मवीर शंकररावजी काळे, सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे, पंडितराव जाधव, लोकनेते नामदेवरावजी परजणे या परिवारासह कोपरगांव तालुक्यातील अनेक कुटुंबाशी जवळचे स्नेह संबंध राहिले आहे.नासिक सह निफाडच्या पाणी वापर सोसायट्यांमुळे कोपरगावचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला. कोपरगांवचे हक्काचे पाणी कमी होऊ लागले. अशा प्रसंगी महाराष्ट्र शासना विरुद्ध अँड. वसंतराव को-हाळकर आणि अँड. शंकरराव आढाव यांनी न्यायालयात दावा दाखल केला. अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करून न्यायालयात दावा यशस्वीरित्या जिंकला. शंकररावजी काळे साहेब यांनी सार्वजनिक सभेत दोन्ही वकिलांना (अँड. वसंतराव को-हाळकर आणि अँड. शंकरराव आढाव ) प्रत्येकी एक तोळ्याची सोन्याची अंगठी भेट देऊन तोंड भरुन कौतुक केले. याच काळात अँड. शंकरमामा यांनी गोदावरी नदी परिसरातील सर्व धरणे प्रत्यक्ष फिरुन अभ्यास केला.शंकरमामा यांनी कोपरगाव न्यायालयात सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ वकीली व्यवसाय केला. कोपरगांव न्यायालयात पितृत्व लादल्याचा खटल्यात अँड. शंकररावांनी मिळून दिलेला न्याय आजही चर्चिला जातो. कोपरगांव वकील संघाचे “अध्यक्ष” म्हणून उल्लेखनीय काम पाहिले.अँड. शंकरराव हे पत्नी रंजनाताई (मामी) यांची मोलाची साथ लाभली असल्याचे आवर्जून सांगायचे.

शंकरमामांचे वकील क्षेत्रासोबत विविध सहकारी संस्थांच्या जबाबदारी यशस्वीपणे यशस्वीपणे सांभाळत असतांना पासून रंजनाताई शेती व्यवसाय पुर्ण सांभाळत आहे.शंकरमामा यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले. मोठा मुलगा वैभव यांनी भारती विद्यापीठ पुणे येथे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स व बिझनेस मॅनेजमेंट पदविका संपादन केली आहे. ते आज कोपरगांव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत. मुलगी सौ. वैशाली दिलीप तिडके तर दूसरी मुलगी सौ. स्वप्ना राहुल पोखरकर ह्या कॅनडा येथे अॅनिमेशन तज्ञ म्हणून काम पहातात. सर्वात लहान सुपुत्र मंदार हे मेकॅनिकल इंजीनिअर आहे. ते व्यापार क्षेत्रात असुन मराठा पंच मंडळाचे विश्वस्त आहेत.

शंकरमामांचे सूना सौ. गितांजली व सौ. जान्हवी या उच्च शिक्षित आहे.नातू साहिल, अमन, कु. राजहंस, कु. मनस्वी, पियुश हे उच्च शिक्षण घेत आहेत.अँड. शंकरमामा यांनी कोपरगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून १९९२ पासून सुमारे ३० वर्ष कामकाज पाहिले. सोसायटीच्या जडणघडणीत सखाराम पाटील आढाव, सुर्यभान पाटील महाले, म्हाळू पाटील आढाव, माधवराव (आप्पा) आढाव, माधवराव बाजीराव आढाव यांचे योगदान असल्याचे आवर्जून सांगायचे.अँड. शामराव भोकरे यांचे आग्रहाखातर शंकरमामा यांनी मराठा पंच मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे कामकाज पाहिले.

म्हाळू पाटील आढाव, बाबुराव पाटील नरोडे, शंकर जयाजी आढाव, अँड. दिनकर (भाऊ) बोर्डे, दिलीप वाघ, कारभारी नजान यांचेसह अनेकांचे मराठा पंच मधील योगदानबद्दल शंकरमामा आवर्जून सांगायचे. या माध्यमातून ग्रामदैवत बिरोबा (विरभद्र) मंदिर, कोपरगावचे दक्षिणमुखी हनुमान मंदिर,श्री काळभैरवनाथ मंदिर यासह विविध वास्तूंचा कारभार पाहिला जातो.मराठा पंच मंडळाचे माध्यमातून गरजूंना विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत ही कल्पना महाराष्ट्रात प्रथम शंकरमामा आणि सहकारी यांनी आणली होती.कोपरगांवच्या मुख्य रस्त्यालगत मराठा पंच जागेत महाराष्ट्रातील उल्लेखनीय पुतळ्यांपैकी कोपरगाव शहराचे वैभवात भर घालणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखणा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टी कोपरगांव नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे.

मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष म्हणून अँड. शंकरमामा यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य शिवप्रेमी मंगेशराव पाटील यांचे माध्यमातून प्रारंभी केले आहे.कायदेशीर ज्ञान, मीतभाषी स्वभाव, सभ्य माणसांच्या पंगतीत वावरणारे शंकरमामा फार धार्मिक कार्यात न रमता सत्कर्माला नेहमी स्थान देत राहिले. थोडक्यात सांगायचे तर त्यांनी माणसात देव पाहिला.गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात मदत केल्याचे अनेक जण सांगतात. मामा नेहमी ज्ञानी आणि गुणी माणसाला आदराने वागणुक देत राहिले. त्यामुळे त्यांना सर्व जातीधर्माच्या लोक “मामा” या आपुलीच्या नात्याने हाक मारायचे.शंकरमामा यांचे वयाने कितीही लहान व्यक्ती सोबत बोलतांना ‘अहो-काहो” अशा पध्दतीने बोलणे हे एक सभ्य व्यक्तीमत्वाचे उदाहरण आहे. “मामा” आज आपल्यात नाहीत. पौर्णिमा माघ स्नान समाप्ती (बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५) या दिवशी वयाच्या ८५ व्या वर्षी सकाळी आपला देह ठेवला. तत्वनिष्ठ वाटेवर जिद्दीने प्रवास करणारे दीपस्तंभ शंकरमामांना भावपुर्ण श्रध्दांजली…

शब्दांकन : सुशांत घोडके
(लेखक हे गोदावरी तीर परिसर इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य आहेत…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे