विज्ञान व तंत्रज्ञान स्वीकारले तरच देशाचा विकास – माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
विज्ञानाची सुरुवात माणसाच्या मनात असलेल्या उत्सुकतेतून आणि उत्कंठेतून झाली. त्या उत्सुकतेतून काही प्रश्न निर्माण झाले आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी विज्ञानाची निर्मिती झाली. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. विज्ञानाचा विकास कसा करायचा, माहितीचा उपयोग कसा करायचा हे समजले पाहिजे. ‘I can Do’ ही संकल्पना समाजामध्ये रुजली पाहिजे, हेच प्रयोगाधिष्ठित शिक्षण आहे. ज्या रस्त्याने कोणी केले नाही त्या रस्त्याने विज्ञानाच्या अभ्यासकांनी जाणे गरजेचे आहे, हे सांगून भारतीय शास्त्रज्ञांकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वप्रथम सी. व्ही.रामण यांनी बदलला. ‘भारतीयांना विज्ञानात गती नाही’ हा समज सर्वप्रथम त्यांनी दूर केला. संशोधनात भारतीयांना सवलत दिली जात नव्हती.

आज खगोलशास्त्र, आयुर्वेद, योगाभ्यास, गणिता या क्षेत्रात भारतीयांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. विसाव्या शतकात जेव्हा विज्ञान साहित्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा रामानुजन, सी. व्ही. रामण, डॉ.होमि भाभा, महिंद्रालाल सरकार, आशुतोष मुखर्जी, सत्येंद्रनाथ बोस, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, रघुनाथ माशेलकर आदींचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय विज्ञान साहित्याचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विशद करून प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देताना मा.डॉ. पंडित विद्यासागर सर हे माझे गुरु असून मी त्यांचा सदैव ऋणी असेल असेही आवर्जून सांगितले. या प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मोहन सांगळे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, IQAC समन्वयक डॉ.निलेश मालपुरे यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रा. अंकिता प्रसाद व प्रा. प्रियंका काशीद यांनी केले. आभार विज्ञान मंडळाचे चेअरमन प्रा. एस. एस. गायकवाड यांनी मानले.