राष्ट्रीय सेवा योजना ही संस्काराची कार्यशाळा-प्रा.गणेश निमसे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
राष्ट्रीय सेवा योजनेच्या जडणघडणीत युवकांचे मोलाचे स्थान आहे. देशाच्या विकासात युवकांचा सहभाग मोलाचा असून देशाच्या विकासाला गती देण्याची क्षमता युवकांमध्ये असते. असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.गणेश निमसे यांनी केले. ते कोपरगाव येथील सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.सदर प्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात, समाज जडणघडणीत युवकांचा मोलाचा वाटा असतो. राष्ट्राच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती देण्याचे काम युवक करत असतात. युवावस्था आणि वृद्धावस्था हे समाजाचे घटक असतात, परंतु समाजाला योग्य दिशा देण्याचे काम युवक करत असतात. युवकांनी अष्टौप्रहर काम करावे आणि नाविन्यपूर्ण गोष्टी कराव्या व त्या शिकण्यास आग्रह धरावा, युवकांनी स्वतःला आधुनिक युगात अद्ययावत ठेवावे, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवल्याने बौद्धिक व सामाजिक विकास होतो. यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना हा उत्तम पर्याय आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी वेळेचे नियोजन करावे प्रसार माध्यमाचा योग्य वापर करावा व अतिरेकी समाजमाध्यमांच्या आहारी न जाता वाचन करावे. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी’ हे आहे. या ब्रीदवाक्याचा विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकार करावा, सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी झोकून द्यावे. उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी स्वयंसेवकांना मोठा वाव आहे. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक युवकाची आहे, ती त्याने पार पाडली पाहिजे.

नेतृत्वगुणांच्या विकासाला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी व्हावे.असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख उपस्थिती लाभलेले डॉ. गायकवाड बी.एस यांनी, राष्ट्र सेवा योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन करताना विद्यार्थ्यांनी राष्ट्र सेवा योजनेत आपले नेतृत्व गुण सिद्ध करावे. असे आवाहन केले.अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, नेतृत्वगुण यांचा विकास करणारी संस्था आहे. विद्यार्थ्यांनी समाजात वावरताना आपली ध्येय निश्चित करावी, ध्येय प्राप्तीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, त्यामुळे व्यक्तिमत्व विकास मोठ्या प्रमाणात होतो. असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.बंडेराव तऱ्हाळ यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत, डॉ.सुभाष सैंदनशिव, डॉ.योगेश दाणे, डॉ.बाळू वाघमोडे, डॉ.प्रमोद चव्हाण यांसह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी पाटोळे यांनी केले तर आभार प्रा.महेश दिघे यांनी मानले.