एस.एस.जी.एम. महाविद्यालयात ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रमाचा शुभारंभ

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयात दिनांक ८ जानेवारी २०२५ पासून ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला’ अनुसरून ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विस्तृत ओळख व्हावी, या धोरणाचा उद्देश विद्यार्थी व पालक यांच्या लक्षात यावा. तसेच, कौशल्ययुक्त शिक्षणाची जाणीव या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हा आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून विद्यापीठाने ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रमाची आखणी करून प्रत्येक महाविद्यालयाने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या उपक्रमात शालेय विद्यार्थी भेटी व मार्गदर्शन, पालकांशी संपर्क व सुसंवाद, महाविद्यालयात चालविल्या जाणाऱ्या विशेष उपक्रमांची माहिती करून देणे, महाविद्यालयातील भौतिक सुविधा व नव्या तंत्रज्ञानयुक्त उपकरणांची ओळख करून देणे,जागतिक पातळीवरील ज्ञानात्मक देवाणघेवाणीची गरज, ॲकॅडेमिक बँक क्रेडिट व त्याचे महत्त्व, आंतर विद्या शाखीय शिक्षणाची आवश्यकता, कौशल्ययुक्त शिक्षण व रोजगाराभिमुखता, अभ्यासक्रम पूरक कोर्सेस, रोजगारयुक्त शिक्षण इ. बाबींचा समावेश आहे.

या सर्व बाबींची जाणीव विद्यार्थी व पालकांमध्ये होऊन त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंगीकारण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे एस. एस. जी. एम. महाविद्यालयाने तत्परतेने ‘स्कूल कनेक्ट’ हा उपक्रम हाती घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी सांगितले. याबरोबरच हा उपक्रम सहकाऱ्यांनी सर्व क्षमतेने राबवावा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसेच, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी या उपक्रमात सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा,असेही आवाहन डॉ. सरोदे यांनी केले आहे.