ताईबाई पवारांच्या कामगिरीची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली दखल

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
तिघे भाऊ गोदावरी नदीच्या पाण्यात वाहून जात असतांना त्यांना वाचविण्यासाठी जीवाची पर्वा न करता नदी प्रवाहात उतरून प्रसंगावधान राखत अंगावरच्या साडीचा दोर करून त्यातील दोघांना जीवदान देणाऱ्या ताईबाई पवार यांच्या धैर्याची व शौर्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली असून आपण केलेली अजोड कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील येथील तांगतोडे कुटुंबातील संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे व अमोल भीमाशंकर तांगतोडे तिघे भाऊ गोदावरी नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मंजूर येथे गोदावरी नदीकाठी असलेला आपला वीजपंप बाहेर काढण्यासाठी गुरुवार (दि.२५) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून चालले होते. त्यावेळी त्या ठिकाणी शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या ताईबाई पवार यांनी या भावंडांना वाचविण्यासाठी आपले पती छबुराव पवार व मुलगी कविता गांगुर्डे यांच्यासह वाहत्या पाण्यात उतरल्या. त्यावेळी या वाहून जाणाऱ्या भावंडांपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे ताईबाई पवार यांनी प्रसंगावधान राखत अंगावरची साडी काढून त्याचा दोर बनवत त्यातील दोन भावांना जीवदान दिले. त्यांच्या या प्रसंगावधानाची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम,अल्पसंख्यांक अध्यक्ष इंद्रिस नाईकवाडी, सामाजिक न्याय अध्यक्ष सुनिल मगरे,युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दक्षिण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा,सुभाष शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात ताईबाई पवार यांना रोख रक्कम अकरा हजार रुपये देवून यथोचित सन्मान करून त्यांच्या अजोड कामगिरीचा गौरव केला होता.या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी देखील त्यावेळी ताईबाई पवार व त्यांच्या कुटुंबाचे कौतुक केले होते. नुकतेच रुपाली चाकणकर यांनी ताईबाई पवार यांना व्यक्तिश: पत्र पाठवून त्या पत्रात त्यांनी आई ही जननी असते, जगन्माता असते आणि वेळप्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी आदीशक्ती असते हेच तुमच्या कृतीतून सिद्ध होत असून आपण दाखविलेले शौर्य आणि धैर्य महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमात आपला आदर सत्कार करून आम्हाला आपल्या अजोड कामगिरीची माहिती मिळाली. आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या मागणीवरून देश पातळीवर प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे साहेब व राज्य पातळीवर आ.आशुतोष काळे व मी स्वत: ताईबाई पवार यांची शौर्य पुरस्कारासाठी निवड व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.