कोपरगावच्या क्रीडा संकुलाला उपमुख्यमंत्री ना.अजितदादांकडून मान्यता

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेला दिलेल्या एकेक वचनांची पूर्तता करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी अजून एक वचन पूर्ण करण्यात यश मिळविले असून मागील चार वर्षापासून कोपरगाव शहरात अद्यावत क्रीडा संकुल व्हावे यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मंगळवार (दि.३०) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून कोपरगाव शहरात उपलब्ध असलेल्या जागेवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी कोपरगावमध्ये सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेले भव्य क्रीडा संकुल उभारण्यास मान्यता दिली असल्याची गोड बातमी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना दिली आहे.
कोपरगावच्या युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी, त्यांच्या कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळावे ही माझी सुरुवातीपासून ठाम भूमिका होती. कोपरगावात भव्य क्रीडा संकुल उभारण्यास उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिलेली मान्यता ही केवळ एक विकास योजना नाही, तर ही आपल्या युवकांच्या भविष्यासाठी दिलेली अमूल्य भेट आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही घोषणा झाल्याने हा निर्णय कोपरगावकरांसाठी दुहेरी आनंद घेऊन आलेला आहे. हे संकुल कोपरगावच्या उदयोन्मुख खेळाडूंसाठी वरदान ठरेल व आजवर क्रीडा संकुल नसल्यामुळे अपूर्ण राहिलेली त्यांची स्वप्ने पूर्ण होतील याची मला खात्री आहे. आगामी काळात लवकरात लवकर हे क्रीडा संकुल उभे रहावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरूच राहील-आ.आशुतोष काळे
कोपरगाव शहरात अनेक खेळात पारंगत असलेले खेळाडू असून त्यांना नियमित सरावासाठी व विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घेण्यासाठी कोपरगाव शहरात सुविधा उपलब्ध नव्हत्या. कोपरगाव शहरातील तरुणाईला सोयीस्कर होईल असे कोपरगाव शहरालगत क्रीडा संकुल होणे गरजेचे होते. कोपरगाव शहरालगत क्रीडा संकुल व्हावे अशी कोपरगाव शहरातील तरुणाईची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती परंतु ती मागणी पूर्ण होवू शकली नाही त्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंचे भविष्य अंधकारमय झाले होते. कोपरगाव शहरातील तरुणाईला सोयीस्कर होईल असे कोपरगाव शहरालगत सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुल उभारणार असे वचन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आ.आशुतोष काळे यांनी दिले होते.दिलेल्या वचनांची जाणीव ठेवून २०१९ ला निवडून आल्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी त्याबाबत प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला होता व अविरतपणे त्यांचा पाठपुरावा सुरु होता. २०२१ मध्ये तात्कालीन क्रीडा राज्यमंत्री ना.आदीतीताई तटकरे यांना देखील वेळोवेळी भेटून कोपरगावच्या तरुणाईच्या भविष्याच्या दृष्टीने क्रीडा संकुल किती महत्वाचे आहे हे पटवून दिले होते. त्यावेळी ना.आदीतीताई तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु कोपरगाव मतदार संघाचे इतरही अनेक महत्वाची विकास कामे प्रलंबित असल्यामुळे सर्वच विकास कामांना निधी मिळवून ती कामे पूर्ण करण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत.

मात्र क्रीडा संकुलाचा प्रश्न अद्याप सुटलेला नव्हता. परंतु आ.आशुतोष काळेंच्या अथक पाठपुराव्यातून क्रीडा संकुलाच्या प्रश्नाला मूर्तरूप प्राप्त होवून झालेल्या बैठकीत कोपरगाव शहरात नवीन क्रीडा संकुल उभारण्यास ना.अजितदादा पवार यांनी मान्यता देवून तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना क्रीडा विभागाला दिल्या आहेत.अत्याधुनिक सुविधा असलेल्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारात स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू घडणार आहेत. तरुणांना क्रीडा प्रकाराबाबत योग्य प्रशिक्षण, क्रीडा शक्तीला प्रोत्साहन देवून स्थानिक खेळाडूंना प्रगतीच्या अधिक संधी प्राप्त होणार आहे.उदयोन्मुख खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी हे क्रीडा संकुल मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून क्रीडा संकुलाच्या मान्यतेमुळे आ.आशुतोष काळेंच्या अजून एका वचनाची पूर्तता होणार आहे. या निर्णयामुळे कोपरगावच्या युवकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना, शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षकांनी आ.आशुतोष काळे यांचे अभिनंदन करताना ही एक ‘दसरा’ सणाची अमूल्य भेट असल्याची भावना व्यक्त केली आहे.

कोपरगावसारख्या ग्रामीण भागातील युवक केवळ शिक्षणातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आपली चमक दाखवू शकतात एवढी गुणवत्ता कोपरगावच्या तरुणाईकडे आहे परंतु क्रीडा संकुल उपलब्ध नसल्यामुळे तरुणाई आपले स्वप्न पूर्ण करू शकत नव्हती.परंतु कोपरगाव शहराच्या क्रीडा संकुलाला मान्यता मिळाल्यामुळे क्रीडा क्षेत्रात कोपरगावचे नाव पुन्हा झळकले जाणार आहे. लवकरच सर्वाजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या समवेत प्रस्तावित जागेची पाहणी करून आराखडा करण्यात येणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. या बैठकीसाठी क्रीडा मंत्री ना.माणिकरावजी कोकाटे तसेच वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, राज्याच्या क्रीडा आयुक्त श्रीम.शीतल तेली-उगले, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, डॉ.राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आ.आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव नागरगोजे, जिल्हा क्रीडाधिकारी खुरांगे सहभागी झाले होते.