तुम्ही योग्य पद्धतीने पंचनामे केले तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होई – आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदार संघातील शेतकरी हवालदिल झाला असला तरी पुन्हा नव्या उमेदीने उभा राहणार आहे. महायुती शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे आणि यावेळीही राहणार आहे. मात्र यामध्ये तुमची भूमिका अत्यंत महत्वाची असून तुम्ही योग्य पद्धतीने पंचनामे केले तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.अतिवृष्टीमुळे मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने व तातडीने करून त्याचा अहवाल लवकरात वरिष्ठांकडे सादर करावा एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सक्त सूचना आ.आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिल्या आहेत.कोपरगाव मतदारसंघात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत शेतकरी व नागरीकांच्या असलेल्या तक्रारींची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी शुक्रवार (दि.०३) रोजी तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी संदीप दळवी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण राज्यासह कोपरगाव मतदार संघावर आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.रविवार (दि.२८) रोजी मतदार संघातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करत असतांना सोयाबीन, कापूस पिके तर पूर्ण नेस्तनाबूत झाली असून इतर पिकांची परिस्थिती देखील वेगळी नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील निघणार नाही. त्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरसकट पंचनामे करावे.अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल शासन दरबारी लवकरात लवकर कसा जाईल याचा गांभीर्याने विचार करा. वेळ थोडा असून वेळ जरी थोडा असला तरी एकही शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा राहणार नाही जेणेकरून एकही शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचीत राहणार नाही याची काळजी घ्या. छोट्या ओढ्या नाल्यांना पूर आल्यामुळे हे पुराचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊन संसारोपयोगी साहित्याचे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी असो वा सामान्य नागरिक सर्वच नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून द्यायची आहे.त्यासाठी महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याची जबाबदारी वेळेत योग्य पद्धतीने पार पाडावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.या बैठकीसाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,अनिल कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, गौतम बँकेचे संचालक श्रीकांत तीरसे,बापूसाहेब जावळे तसेच मतदार संघातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.