कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनासाठी १.७३ कोटी निधी मंजूर – आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषीमाल विक्रीसाठी घेवून येणाऱ्या शेतकरी बांधवांची मुक्कामाची सोय व्हावी. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन बांधण्यासाठी १.७३ कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव कृषी बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन नसल्यामुळे शेतमाल विक्री प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जोपर्यंत आपल्या शेतमालाचे दाम हातात पडत नाही तोपर्यंत आराम करण्यासाठी शेतकऱ्यांना हक्काचा विसावा उपलब्ध नव्हता.

तसेच ज्यावेळी आवक वाढलेली असते त्यावेळी मुक्कामाची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेतमालाची वाहने कृषी उत्पन्न बाजार समितीत सोडून जावी लागतात व दुसऱ्या दिवशी पुन्हा यावे लागते. अशा अनेक अडचणींचा सामना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना करावा लागत होता. आणि जर पाऊस असेल तर या अडचणी अधिकच वाढत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी हेळसांड पाहून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन बांधण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल करून त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी भवन बांधण्यासाठी १.७३ कोटी निधी दिला आहे.या निधीतून भव्य शेतकरी भवन उभारण्यात येणार असून त्यामध्ये शेतकऱ्यांना राहण्याची सुविधा, अल्प दरामध्ये चांगल्या प्रकारचे उपहार गृह, तसेच व्यापारी संकुल,सुसज्ज सभागृह, कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी सुविधांयुक्त कार्यालय अशा सुविधा उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे रात्री अपरात्री शेतमाल विक्रीसाठी घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी भवनाच्या माध्यमातून आपल्या हक्काचे निवासस्थान मिळणार आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन बांधण्यासाठी १.७३ कोटी निधी मिळवून दिल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व शेतकऱ्यांनी आभार मानले आहे. शेतकरी भवनासाठी १.७३ कोटी निधी दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, पणन मंत्री ना.जयकुमार रावल यांचे आभार मानले आहे.