तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा आ. आशुतोष काळेंची कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
चालू वर्षी सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्यास सहमती दिली आहे. मात्र पाण्याची जास्तीत जास्त बचत करून तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा अशी आग्रही मागणी आ.आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असून त्या मागणीला जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवार (दि.०६) रोजी पार पडली. या बैठकीस आ. आशुतोष काळे यांच्या समवेत खा.भाऊसाहेब वाकचौरे, आ. हेमंत ओगले,मा.आ. सौ. स्नेहलता कोल्हे, महानंदाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, बाबासाहेब कोते, मुकुंदराव सदाफळ, अभय शेळके, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, दिलीप चौधरी, मच्छिन्द्र चौधरी, आण्णासाहेब कोते, दीपक वाघ, नारायण कदम, शाम जगताप, कैलास आहेर, महेश औताडे, विजय चौधरी तसेच जलसंपदा व कृषी विभागाचे अधिकारी आदी मान्यवरांसह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरचे सर्व धरणे रिकामी केली तरी जायकवाडी धरण भरूच शकत नाही हि वस्तुस्थिती आहे.त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आढावा घेणाऱ्या गोदावरी अभ्यास गट (०२) ने जायकवाडीसाठी ६५ टक्क्यावरून वरून ५८ टक्के करण्याची शिफारस केली असली तरी या शिफारशी स्विकारतांना त्यामध्ये अजून काही सुधारणा करता येवून अती तुटीच्या गोदावरी खोऱ्याची पाण्याची तुट कशी भरून काढता येईल यासाठी गांभीर्याने विचार करावा अशी मागणी देखील आ. आशुतोष काळे यांनी या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
या बैठकीत पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, आपल्याकडे पाणी आहे पण नियोजन करण्यासाठी कर्मचारी वर्ग अपुरा आहे.त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही हि वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. त्यासाठी जल संपदा विभागात नवीन कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध होईल. ज्या ज्यावेळी पाट बंधारे विभागाकडून आवर्तनाबाबत प्रकटन प्रसिद्ध करण्यात येवून लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी आवाहन केले जाते.त्यावेळेस लाभधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी मागणी अर्ज भरावे यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही देखील पाणी मागणी अर्ज भरावेत यासाठी लाभधारक शेतकऱ्यांना आग्रह धरतो. परंतु दिवसेंदिवस पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने सातत्याने पाणी पट्टीत केलेली वाढ असून उन्हाळ्याची पाणी पट्टी तर पाच हजार पर्यंत गेलेली

असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. हि वाढलेली पाणी पट्टी भरण्याची आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची नाही, त्यामुळे अर्ज भरण्याची संख्या कमी झाली असल्याचे सांगत त्यासाठी पाणी पट्टीबाबत एक मर्यादा असावी अशी मागणी केली असता त्यावेळी उपस्थित लाभधारक शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या मागणीचे स्वागत केले.मागील काळात महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देतांना साडे सात एचपी पर्यंतच्या वीज पंपाचे वीज बिल माफ केले त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. त्याच पद्धतीने सवलतीच्या किंवा माफक दरात दरात पाणी पट्टी करावी जेणेकरून जास्तीत जास्त लाभधारक शेतकरी अर्ज भरण्यास तयार होतील त्याबाबत योग्य विचार करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.