कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा शुक्रवारी गळीत हंगाम शुभारंभ

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ७१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार (दि.३१) रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी दिली आहे.राज्य सरकारने चालू वर्षीचा गळीत हंगाम ०१ नोव्हेंबर २०२५ पासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे बहुतांशी साखर कारखाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऊस गाळप सुरु करतील असा अंदाज आहे. आदर्श सहकाराची परंपरा जोपासत, शेतकऱ्यांच्या विश्वासावर चालणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या शेतकरी हिताच्या विचारांवर तसेच कारखान्याचे जेष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या दिशेने दैदिप्यमान वाटचाल करीत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.७१ व्या गळीत हंगामाच्या सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद वर्ग व उद्योग समूहावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतक, कार्यकर्त्यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.



