निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निरिक्षक अजय कुमार बिष्ट

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिष्ट यांनी आज येथे केले. राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील सभागृहात अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप, आचारसंहिता व खर्चाबाबत मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उमेदवारांना मार्गदर्शन करतांना श्री.बिष्ट बोलत होते.

यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते. याप्रसंगी बिष्ट म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उमेदवारांनी प्रशासनाला सहकार्य करावे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. एकाच चिन्हांसाठी पसंती दिल्या एक पेक्षा जास्त उमेदवारांच्या चिन्हांचे चिठ्ठीद्वारे सोडत काढून वाटप करण्यात आले. तसेच यावेळी उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी निवडणूक आचारसंहितेविषयी मार्गदर्शन केले.