शिर्डी माहिती कार्यालय

शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक १३ मे २०२४ रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे.शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी,कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघाकरीता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

मतदान केंद्रांवरील सोयी- सुविधा

शिर्डी लोकसभेच्या १७०८ मतदान केंद्रावर १३ मे रोजी सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेदरम्यान मतदान पार पडणार आहे. प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, व्हिलचेअर,सुरक्षा व्यवस्था, उष्माघातापासून संरक्षणासाठी औषधे, बैठक व्यवस्था,सावलीसाठी मंडप उभारणी,तसेच पाळणाघर आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे. पत्र्याचे छत असलेल्या मतदान केंद्रावरील छतांवर गवताचे पाचट टाकण्यात येणार आहे. वादळी वाऱ्याने हे पाचट उडून जावू नये. यासाठी यांची बांधणी पक्की करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळी-वारा व पावसाची शक्यता लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडप उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मतदान साहित्याबरोबर मेडीकल कीट ही उपलब्ध करून दिला जाणार आहे. मतदान अधिकारी- कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांची निवासाची व माफक दरात भोजनाची मतदान केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. निवासावेळी कर्मचाऱ्यांची व्यवस्थित झोप व्हावी, यासाठी मच्छर पासून संरक्षणासाठी डास कीट दिले जाणार आहेत. फिरते वैद्यकीय पथके कार्यरत राहणार आहेत‌. अशी माहिती कोळेकर यांनी दिली.

मतदानासाठी २११ एसटी बसेसह ४६९ वाहनांची व्यवस्था

शिर्डी लोकसभांतर्गत विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता १५६ सेक्टरनिहाय ३१२ रूट तयार करण्यात आलेले आहेत. २११ एसटी बसेस, ३८७ जीप, ५१ मिनी बस व ९ कुझर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर अहमदनगर येथे ईव्हीएम मशिन घेऊन जाण्यासाठी १८ कंटेनर वाहन असणार आहेत.

९४०० अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती

शिर्डीतील १७०८ मतदान केंद्रांसाठी ८ हजार ५३० मतदान अधिकारी, कर्मचारी व ८६० राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . ५० सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. सेक्टर अधिकाऱ्याला लोकसभेच्या निवडणुकीसाठी क्षेत्रीय दंडाधिकारी दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर शस्त्रधारी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे‌.

मतदान यंत्र सज्जता

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील मतदान यंत्रांची सिलिंग पूर्ण झाली आहे. अभिरूप मतदान प्रक्रियाही यशस्वी झाली आहे. १७०८ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी १ कंट्रोल युनिट, २ बॅलेट युनिट, १ व्हीव्हीपॅट यंत्रांची उपलब्धता आहे. एकूण कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट यंत्रांच्या २० टक्के प्रमाणात व एकूण व्हीव्हीपॅट यंत्रांच्या ३० टक्के प्रमाणात यंत्रे राखीव ठेवण्यात आले आहेत. मतदान यंत्रांत ऐनवेळी काही तांत्रिक बिघाड झाल्यास यंत्रे तात्काळ दुरूस्त करण्यासाठी प्रत्येक तहसीलमध्ये २ अभियंता नियुक्त करण्यात आले आहेत.

शिर्डी लोकसभा मतदार संघात १६ लाख ७७ हजार मतदार

शिर्डी लोकसभा कार्यक्षेत्रात १६ लाख ७७ हजार ३३५ मतदार असून यामध्ये ८ लाख ६४ हजार ५७३ पुरूष मतदार, ८ लाख १२ हजार ६८४ महिला मतदार आणि ७८ तृतीयपंथी मतदार आहेत.

२२ मतदान केंद्र नेटवर्क शॅडो एरियात

शिर्डी लोकसभेत २२ मतदान केंद्र नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसलेल्या दुर्गम भागात आहेत. तेथे रनरची व्यवस्था असणार आहे. तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावर सर्वातोपरी दक्षता घेण्यात येत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात १२ आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत‌. प्रत्येकी ६ महिला, दिव्यांग व युवक मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत.

पन्नास टक्के मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कॉस्टींग – मतदान केंद्रांच्या हालचालींवर बारीक लक्ष

शिर्डी लोकसभेतील १७०८ मतदान केंद्रांपैकी ८५४ मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कॉस्टींग केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील १२ मोठ्या पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह कॉस्टींग पाहता येणार आहे. त्याद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मतदान केंद्रावरील हालाचालींवर बारीक लक्ष असणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पण मतदान केंद्राचे लाईव्ह कॉस्टींगद्वारे हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

१२ मे रोजी मतदान साहित्य वाटप

शिर्डी लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघात १२ मे रोजी सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ईव्हीएम मशिनसह मतदान साहित्य वाटप केले जाणार आहे.
१) अकोले विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटप अकोले तहसील कार्यालयात,
२) संगमनेर विधानसभेचे भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल (संगमनेर),
३) शिर्डी विधानसभेचे राहाता तहसील कार्यालय,
४) कोपरगाव मतदारसंघाचे सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल,
५) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे श्रीरामपूर तहसील इमारतीत
६) नेवासा विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटप न्यू ग्रेन गोडाऊन, मिंकदपूर, नेवासा फाटा येथे होणार आहे. मतदान साहित्य प्राप्त करून घेतल्यानंतर मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर मुक्काम करणार आहेत. मतदानाच्या दिवशी पहाटे ५.३० वाजता उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थित मॉक पोल घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या १३ मे रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमी करणात योगदान द्यावे असे आवाहन कोळेकर यांनी केले आहे.

जाहिरात
जाहिरात
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे