नवीन पाच बसचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते लोकार्पण

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव बस स्थानकाच्या आवारात अनेक ठिकाणी कॉंक्रीटिकरण उखडले जावून खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची हि अडचण दूर करण्यासाठी कोपरगाव बसस्थानकाच्या आगारात नव्याने सिमेंट कॉंक्रीटिकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. लवकरात निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून निधी उपलब्ध होताच संपूर्ण बस स्थानकात नव्याने सिमेंट कॉंक्रीटिकरण करण्यात येईल अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.आ.आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस आगाराला मिळालेल्या नवीन पाच बसचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येवून प्रवाशांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव आगारातून राज्यासह परराज्यात जाण्यासाठी यामध्ये मुंबई, पुणे, नासिक, छत्रपती संभाजीनगर,पंढरपूर, माहूर, अक्कलकोट, गाणगापूर, कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर,पैठण, बीड, शिरपूर व हैद्राबाद याठिकाणी जाण्यासाठी अशा अनेक लांब पल्याच्या गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. परंतु या गाड्या जुन्या झाल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसत होता. कोपरगाव आगाराकडे अगोदरच बसची कमी असलेली संख्या व काही बसेस जुन्या होवून कायमच नादुरुस्त होत असल्यामुळे नियमितपणे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे नवीन बस मिळाव्यात यासाठी परिवहन खात्याकडे नियमितपणे पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून पाच महिन्यापूर्वी कोपरगाव आगाराला पाच नवीन बस मिळाल्या आहेत व पुन्हा नव्याने पाच बस मिळाल्यामुळे येणाऱ्या दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना येणाऱ्या अडचणी निश्चितपणे दूर होवून प्रवास सुखकर होईल. यापुढील काळात अजून बस कशा मिळविता येतील यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. त्यामुळे बसने मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या महिला भगिनी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणी कायमच्या दूर होतील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

यावेळी कोपरगाव बसत स्थानकालगत सुरु असलेल्या व्यापारी संकुल व बस चार्जिंग स्टेशनच्या कामाची त्यांनी पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशा सूचना दिल्या. कोपरगाव आगाराला पुन्हा नवीन पाच बस दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांचे कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने व प्रवाशांच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी आगार प्रमुख अमोल बनकर, ज्येष्ठ नेते पद्माकांतजी कुदळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.