नवीन जीएसटी निर्णयाचे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले स्वागत

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या धोरणातून व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीतील १२ व २८ टक्के स्लॅब रद्द करून फक्त ५ व १८ टक्के हेच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून २२ सप्टेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू झाल्यानंतर अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.कृषी क्षेत्राला बऱ्याच अंशी मदत या निर्णयामुळे होणार असल्याचे दिसून येते.या निर्णयाचे स्वागत करताना कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष व युवानेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, सण-उत्सवाच्या पार्श्वqभूमीवर आलेला हा निर्णय सर्वांसाठी आनंददायक ठरणार आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील करकपातेमुळे महागाईवर नियंत्रण येईल आणि कुटुंबांचा आर्थिक ताण हलका होईल. किराणा सामान, कपडे, घरगुती उपकरणे यावरचा करकपात सर्वसामान्यांना थेट दिलासा देणार आहे.सरकारने कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आता ट्रॅक्टरचे टायर आणि सुट्या भागांवरील जीएसटी १८% वरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. आता ट्रॅक्टरवर १२% ऐवजी फक्त ५% कर आकारला जाईल.तसेच बयो-पेस्टीसाईड्स जैव-कीटकनाशके, माइक्रोन्यूट्रिएंट्स, ड्रिप इरिगेशन सिस्टम (ठिबक सिंचन प्रणाली) आणि आधुनिक कृषी यंत्रसामग्री देखील आता ५% कर स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. यामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल.आरोग्य व शिक्षण क्षेत्रालाही मोठा फायदा होणार असल्याचे कोल्हे यांनी नमूद केले.

औषधे, वैद्यकीय उपकरणे, रुग्णालयीन सेवा तसेच काही शैक्षणिक सेवांवरील करकपात ही गरीब व मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.उद्योग क्षेत्रालाही करसवलतीचा फायदा होणार असून रोजगार निर्मितीस चालना मिळेल. लघु व मध्यम उद्योगांवरील भार कमी झाल्याने उत्पादन खर्च घटेल, स्पर्धात्मकता वाढेल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. बांधकाम व गृहनिर्माण प्रकल्पांवरील सवलतींमुळे गृहस्वप्न साकार करणे सोपे होईल.शेतकरी, व्यापारी, कामगार, विद्यार्थी अशा सर्व घटकांना या निर्णयाचा थेट किंवा अप्रत्यक्ष लाभ होईल, असे मत कोल्हे यांनी व्यक्त केले. सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारही या निर्णयाचा लाभ जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.