कोपरगावात आ.आशुतोष काळेंच्या हस्ते ८७ लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहराला पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे. मागील काही वर्षांत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. विशेषतः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गी लागलेला नव्हता. तो प्रश्न आता सुटल्यात जमा आहे. रस्त्यांचा प्रश्न देखील मार्गी लागणार असून या विकासकामांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नगरपरिषद, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयानेच शहराचा खऱ्या अर्थाने विकास होणार असून येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत अव्वल करायचे आहे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या विविध नागरी सुविधांच्या कामांना गती मिळाली असून कोपरगाव शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तरीय) योजने अंतर्गत प्रभाग क्र. ११ मध्ये २६ लाख ९८ हजार रुपये निधीतून शिवा पंडोरे घर ते नाना चहावाले घर भूमिगत गटार करणे,अक्षय आंग्रे घराजवळ पेव्हिंग ब्लॉक बसविणे, राज टी हाऊस ते बल्लाळेश्वर मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, राज टी हाऊस ते रशीद शेख वकील पेव्हिंग ब्लॉक बसविणे तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरविणे योजने अंतर्गत प्रभाग क्र. १० मध्ये ५९ लाख ९५ हजार रुपये निधीतून वाघ घर ते कन्या शाळा रस्ता व अंतर्गत रस्ता करणे आदी जवळपास ८७ लाखांच्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज आणि इतर नागरी मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी सर्व विकासकामांना गती देणार आहे. शहरातील बहुतांश मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत परंतु प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची कामे पूर्ण करायची आहेत. त्या अनुषंगाने ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

कामे पूर्ण झाल्यानंतर नागरीकांच्या कित्येक वर्षापासूनच्या अडचणी कायमच्या दूर होणार आहेत. कोपरगाव शहराच्या विकासाला गती देण्याचा माझा संकल्प आहे. मागील काही वर्षांपासून पाणी प्रश्नाप्रमाणे प्रलंबित असलेली अनेक महत्वाची कामे यापुढील काळात निश्चितपणे मार्गी लागणार आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विकासकामे सुरू आहेत. नागरी सुविधा सक्षम करून शहरवासीयांचा जीवनमान उंचावणे, हीच माझी प्राथमिकता असून ही विकासकामे पूर्ण झाल्यानंतर कोपरगाव शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व कामे चांगल्या प्रकारची होतील याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे तसेच प्रशासनाने देखील कामाची गुणवत्ता राहील याची काळजी घेऊन संबंधित विकास कामांबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्या ठेकेदारांकडून ती कामे पूर्ण करून घ्यावीत अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामे आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून मार्गी लागल्याबद्दल नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले.