उजनी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्याच्या आ.आशुतोष काळेंच्या सूचना

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
२०१९ पासून दरवर्षी अविरतपणे सुरु असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन याहीवर्षी सुरु करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या असून वीज बिलाची रक्कम अदा करून किरकोळ दुरुस्तीची कामे देखील लवकरात लवकर करण्यास सांगितले आहे. अशी माहिती रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्याच्या संगमनेर, राहाता तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या जिरायती भागातील जवळके-धोंडेवाडी परिसराच्या गावातील शेती व शेतकऱ्यांसाठी आधारवड असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना ओव्हर फ्लोच्या पाण्यावर अवलंबून असून त्यासाठी गोदावरी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून जिरायती भागातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची अडचण दूर होवू शकते या दूरदृष्टीतून माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात २०१४ पर्यंत हि योजना पदरमोड करून दरवर्षी नियमितपणे सुरु ठेवली. परंतु मध्यंतरीच्या काळात २०१९ पर्यंत ह्या योजनेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जवळके-धोंडेवाडी परिसराच्या गावातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते.

मात्र २०१९ पासून आ.आशुतोष काळे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हि योजना पाचही वर्ष सुरु ठेवल्यामुळे जिरायती भागातील हि गावे पाण्याच्या बाबतीत समृद्ध होवून उन्हाळ्यात सुद्धा पाण्याचे टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. हि परिस्थिती कायम ठेवण्यासाठी याहीवर्षी आ. आशुतोष काळे यांनी सर्व प्रकारचे खर्च भागवून हि योजना पुन्हा सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निळवंडे कालव्यांचे पाणी जिरायती भागातील काही गावात पाहोचले असले तरी वितरिकांची कामे अपूर्ण असल्यामुळे संपूर्ण लाभक्षेत्रात पाणी पोहोचू शकलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत निळवंडे कालव्यांचे पाणी संपूर्ण लाभक्षेत्रात पोहोचत नाही तोपर्यंत आ. आशुतोष काळे उजनी उपसा जलसिंचन योजना सुरूच ठेवणार आहेत. अशी माहिती उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिली आहे.