पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबाचे आ.आशुतोष काळेंनी केले सांत्वन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
काही दिवसापूर्वी कोपरगाव तालुक्यातील काकडी मल्हारवाडी येथील डोशी कुटुंबातील सख्या भावा-बहिणीचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या चिमुरड्यांच्या कुटुंबाची आ.आशुतोष काळे यांनी भेट घेवून घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेवून डोशी कुटुंबाचे सांत्वन केले.मल्हारवाडी शिवारातील प्रशांत डोशी यांचा मुलगा साहिल प्रशांत डोशी (वय वर्ष १२) हा चिमुकला तळ्यात पाणी आणण्यासाठी खोदण्यात आलेल्या नालीत पोहण्यासाठी गेला होता. परंतु पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे वाहत जात तो तळ्यात बुडू लागला असता त्याची बहिण दिव्या प्रशांत डोशी (वय १५) हि साहिलला वाचविण्यासाठी गेली. परंतु पाण्याच्या अंदाज न आल्याने या दोघाही बहिण-भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या दुःखद घटनेबाबत आ.आशुतोष काळे यांनी डोशी कुटुंबीयांची भेट घेवून शोक व्यक्त केला. सदर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायक आहे. या चिमुकल्याच्या जाण्याने डोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. अनेक गावात कालव्याचे पाण्यातून पाझर, तलाव, बंधारे भरलेले आहेत व शाळांना देखील सुट्टीचे दिवस आहेत. त्यामुळे नागरीकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रविण शिंदे, बाळासाहेब शिंदे, आण्णापाटील रानोडे, चांगदेव डांगे, नामदेव रानोडे, अर्जुन रानोडे, सिताराम रानोडे, बाबासाहेब रानोडे आदी उपस्थित होते.