बिबट्यांची नसबंदी करा अन्यथा सर्वांना भविष्यात धोका – विवेकभैय्या कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदारसंघात वाढत्या बिबट्यांच्या संख्येमुळे नागरिकांचे तसेच पाळीव जनावरांचे प्राण धोक्यात आले आहेत. अलिकडच्या काळात अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले घडून नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या असून पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे.

या संदर्भात कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शासनाकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रित रहावी व त्यांची शहरी वस्तीमध्ये वावरण्याचा धोका कमी व्हावा यासाठी बिबट्यांची वैज्ञानिक पद्धतीने नसबंदी करण्याची मोहीम राबविणे हा योग्य व दीर्घकालीन उपाय असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.कोल्हे पुढे म्हणाले की, सध्या नागरिक भागात फिरणाऱ्या व जंगलातील बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवले गेले नाही तर नागरी भागात त्यांची उपस्थिती वाढत जाईल व त्यामुळे आणखी अपघात, हल्ले व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल.

शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वनविभाग, प्राणीवैद्यकीय विभाग व स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम राबवावी.यासह वनविभाच्या अंतर्गत मनुष्यबळ कमतरता असून पिंजऱ्यांची संख्या देखील पुरेशी नाही त्यातही वाढ करून आवश्यक ती पूर्तता होण्याची गरज आहे.नागरिकांच्या जीविताचे रक्षण व जनावरांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम काळाची गरज असून शासनाने तातडीने यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.