श्रावण मास पार्श्वभूमीवर गोदाघाट सुरक्षेसह महिला भाविकांच्या सुविधांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे नगरपालिकेला निवेदन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पवित्र श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले. गंगा-गोदावरी घाटावरील सुरक्षा कठडे तातडीने दुरुस्त करणे, स्नानासाठी येणाऱ्या महिला भगिनींसाठी सुरक्षित वस्त्रपरिवर्तन कक्षांची उभारणी करणे आणि अमरधाम परिसरात महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह उभारण्याची मागणी यामध्ये करण्यात आली.हे निवेदन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर निवेदन कार्यालयीन अधिक्षक कविता सोनवणे यांनी स्वीकारले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गोदातीर परिसर श्रावण मासात भक्तांनी फुलून जातो. सोमवारी होणाऱ्या गंगा-गोदावरी महाआरतीस हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. परंतु, गोदा घाटावरील लोखंडी सुरक्षा कठडे मोडकळीस आलेले असून त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हे कठडे तातडीने दुरुस्त करून नागरिकांचे जीवित सुरक्षित करण्याची मागणी प्रतिष्ठानने केली आहे.तसेच, श्रावण महिन्यात गोदातीरावर स्नानासाठी येणाऱ्या महिला भगिनींसाठी वस्त्र बदलण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित दालनांची व्यवस्था आवश्यक आहे.

तात्पूर्ती व्यवस्था संजीवनी युवा प्रतिष्ठान करत आहे मात्र दीर्घकालीन व्यवस्था पालिकेने करण्यासाठी नियोजन करावे.धार्मिक भावना, सामाजिक सुरक्षितता आणि सन्मान जपत, येत्या २०२७ च्या महाकुंभाची पूर्वतयारी म्हणून अशा संरक्षित कक्षांची निर्मिती नगरपालिकेच्या देखरेखीखाली व्हावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्कालीन सेवा यांचा समावेश असलेली भक्कम यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज असल्याचेही प्रतिष्ठानने स्पष्ट केले. यंदाच्या श्रावण महिन्यासाठी वेळेचे बंधन लक्षात घेता, प्रतिष्ठानकडून तात्पुरत्या स्वरूपात एक महिन्यासाठी असे कक्ष उभारण्यास नगरपालिकेची परवानगी मागण्यात आली आहे.त्याचप्रमाणे कोपरगाव अमरधाममध्ये अंत्यविधीनंतर धार्मिक विधींच्या अनुषंगाने स्नान करणाऱ्या महिलांसाठीही स्वतंत्र स्नानगृह व वस्त्र बदलण्याची सोय व्हावी, यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. या निवेदनाच्या माध्यमातून संजीवनी युवा प्रतिष्ठानने सार्वजनिक सुरक्षेसोबत महिलांच्या सन्मानाची जाणीव ठेवत, प्रशासनाकडे बांधीलकीने प्रश्न मांडले आहेत. शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक अस्मितेला पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी ही पावले महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.