अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती
विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अहिल्यानगर जिल्ह्यातील अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत अल्पसंख्याक समुदायातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन,जैन ,पारसी ,ज्यु आणि शिख या घटकातील पात्र विद्यार्थ्यांकडून परदेशात शिक्षणासाठी सन २०२४-२५ करिता अर्ज मागविण्यात आले आहेत.परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आणि अल्पसंख्याक समुदायातील घटकातील असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे. परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील.शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३० टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृतीचा लाभ देता येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा.परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत (क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँक ) २०० च्या आत असावी. सदर योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांस पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणीक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.
योजनेतील लाभाचे स्वरुप –
परदेशातील शैक्षणिक संस्थेने प्रवेशपत्रांमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण शुल्क, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गानी सर्वसाधारण विमान प्रवास भाडे, (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तीक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केलेला खर्च, विहित केलेल्या वित्तीय मयदित मूळ शूल्क भरणा पावती, प्रवासाचे मुळ तिकीट, मूळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रयासाचे तिकीट इ. तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केली जाईल.अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी. संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह ३१ डिसेंबर पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत ऑनलाईन भरुन त्यांची प्रिंट, समक्ष किवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा. तसेच. महाराष्ट्र शासनाची वेबसाईट https://fs-maharashtra.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.