आ.आशुतोष काळेंच्या नेतृत्वात खा.लोखंडेंच्या प्रचार फेरीला कोपरगावात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि.०६) रोजी काढण्यात आलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार फेरीला कोपरगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले.राज्यातील महायुतीच्या सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने आ.आशुतोष काळे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार महायुतीचा धर्म पाळत प्रचारास सुरुवात केली आहे.

त्यामुळे एकीकडे उन्हाचा पारा चाळीसी पार गेला असतांना देखील त्याची तमा न बाळगता आ.आशुतोष काळे यांनी सोमवार रोजी आठवडे बाजारचे औचित्य साधत जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधता यावा यासाठी खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचे आयोजन केले होते.श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून धारणगाव रोडपासून प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला.
त्यानंतर बैल बाजार रोडने बैल बाजारात जावून शेतकरी व्यापारी यांच्याशी हस्तादोलन करीत धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन आ.आशुतोष काळे व खा.सदाशिव लोखंडे यांनी यावेळी केले. त्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कोपरगाव बस स्थानकातील प्रवाशांशी देखील आ. आशुतोष काळे व खा. सदाशिव लोखंडे यांनी संवाद साधला.
त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आठवडे बाजारात जात असतांना श्री. संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात आ.आशुतोष काळे व खा. सदाशिव लोखंडे सहभागी झाले यावेळी त्यांनी फुगडी देखील खेळली. त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रात जावून त्यांच्या प्रतिमेचे मनोभावे दर्शन घेतले.
प्रचार फेरी दरम्यान रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांशी कोपरगावातील सर्व व्यापारी बांधवांशी व नागरिकांशी संवाद साधत बाजारात आलेल्या नागरिकांशी नम्रपणे हात जोडून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे साकडे आ. आशुतोष काळे व खा. सदाशिव लोखंडे यांनी यावेळी मतदारांना घातले. यावेळी मोठ्या प्रमाणात महायुतीचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार फेरीत सहभागी झाले होते. एकुणच प्रचार फेरीला कोपरगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे यावेळी दिसून आले.