रांजणगांव देशमुख उपबाजार समिती केंद्र निर्मीतीसाठी शासकीय जमीन मंजुर-स्नेहलताताई कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगांव शहरासह तालुक्याचा परिसर विस्तीर्ण असुन येथील शेतक-यांना त्यांचा शेतमाल नजिकच्या केंद्रावर खरेदी-विक्री करता यावा यासाठी कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने रांजणगांव देशमुख येथे उपबाजार समिती केंद्र निर्मीतीसाठी आवश्यक त्या कागदपत्रासह गट नंबर ५०५ मधील १ हेक्टर ६० आर जागा मिळावी म्हणून मागणी केली होती त्यास पणनमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी मंजुरी दिल्याची माहिती माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितींने त्यांच्या १८ मार्च २०२५ रोजीच्या सभेत ठराव करून रांजणगांव देशमुख परिसरात उपबाजार समिती केंद्र निर्मीतीसाठी गट नं ५०५ मधील ६.७६ हेक्टर पैकी १ हेक्टर ६० आर जागा २१ वर्ष भाडे कराराने मिळावी म्हणून जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्यासाठी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव मंत्रालय स्तरावर सादर करण्यांत येवुन त्याचा पाठपुरावा केला. रांजणगांव देशमुख सह पोहेगांव पंचक्रोशीतील शेतक-यांना त्यांच्या शेतमाल खरेदी विक्रीसाठी थेट कोपरगांव येथे ये जा करावी लागते त्यात शेतमाल वाहतुकीच्या खर्चासह अन्य खर्च शेतक-यांना सहन करावा लागत होता म्हणून रांजणगांव देशमुख परिसरात उप बाजार समिती केंद्र स्थापन करून येथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या म्हणून रांजणगांव देशमुखं पंचक्रोशीतील शेतक-यांची मागणी होती. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगरचे उपनिबंधक मंगेश सुरवसे त्यांचे कार्यालयीन पत्र क्र. ५७०० दिनांक १० ऑक्टोंबर २०२५ रोजी कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीस रांजणगांव देशमुख उपबाजार समिती केंद्रासाठी १ हेक्टर ६० आर जागा मंजुर करून शेतमाल खरेदी विक्री करण्यासाठी आवश्यक त्या पायाभुत सुविधा उपलब्ध करून देणेबाबत मंजुरी दिली आहे. यामुळे या परिसरातील शेतक-यांची अनेक वर्षाची मागणी पुर्ण झाली आहे.

कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीस रांजणगांव देशमुख उपबाजार समिती केंद्राच्या जमीन मंजुर करणेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पणनमंत्री जयकुमार रावल, जिल्हा उपनिबंधक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर आदिंनी विशेष सहकार्य केल्याबद्दल माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी आभार मानले आहे.