पाच ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी १.१५ कोटीचा निधी मंजूर -आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदार संघातील अनेक ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी रु. १ कोटी १५ लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.यामध्ये कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी, सुरेगाव, घारी, घोयेगाव व पढेगाव या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचा समावेश असून कोळपेवाडी, सुरेगाव, पढेगाव या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी प्रत्येकी २५ लाख तर घारी, घोयेगाव या ग्रामपंचायत कार्यालयासाठी प्रत्येकी २० लाख असा एकूण ०१ कोटी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल कोळपेवाडी, सुरेगाव, घारी, घोयेगाव व पढेगाव या गावातील नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

यापूर्वीही कोपरगाव मतदार संघातील जुन्या झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यातून महायुती शासनाकडून धारणगाव, धोत्रे, मुर्शतपूर, जेऊर पाटोदा, दहेगाव बोलका, करंजी बु., शिंगणापूर व चासनळी ह्या आठ गावांच्या नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे एकूण ०२ कोटी रुपये निधी मिळविण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत व पुन्हा एकदा ०१ कोटी १५ लाख निधी पाच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी त्यांनी मिळविला आहे.आ. आशुतोष काळे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शेवटच्या स्तरावर काम करणारी संस्था असलेली ग्रामपंचायत ग्रामीण भागातील नागरीकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची संस्था आहे. नागरीकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, तसेच जन्म-मृत्यूच्या नोंदी ठेवणे अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणाऱ्या ग्रामपंचायतीला सर्व सुविधांयुक्त ईमारत असणे अत्यंत गरजेचे आहे.जेणेकरून नागरीकांना देखील सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरविणे सहज शक्य होते व ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना देखील कामकाज करतांना अडचणी येत नाही.

त्यासाठी आजवर मतदार संघातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी दिला असून यापुढील काळातही ज्या ज्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतीची मागणी केली जाईल त्या त्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी ०१ कोटी १५ लाख निधी दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे कोळपेवाडी, सुरेगाव, घारी, घोयेगाव व पढेगाव ह्या पाच गावातील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहे.