सभासदांचे हित जोपासून व चांगली सेवा देवून कामगार पतपेढी प्रगतीपथावर ठेवावी-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा करून सभासदांना काटकसर व कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक बचतीसाठी प्रेरणा देणाऱ्या सेवकांच्या पतपेढीचा कारभार पारदर्शकपणे सुरु आहे. कामगार पतपेढीच्या माध्यमातून मर्यादित व्यवसाय सुरु आहेत मात्र सुरु असलेले व्यवसाय सुटसुटीत आहेत. त्यामुळे वार्षिक उलाढाल चांगली असून जरी व्यवसाय मर्यादित असले तरी त्यामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे हि समाधानाची बाब आहे. भविष्यात संस्थेच्या प्रगतीसाठी कारखान्याच्या माध्यमातून आवश्यक असणारे सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. संचालक मंडळाने सभासदांचे हित जोपासून व चांगली सेवा देवून कामगार पतपेढी प्रगतीपथावर ठेवावी असा मौलिक सल्ला आ.आशुतोष काळे यांनी दिला आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सेवकांची पतपेढी या संस्थेची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे चेअरमन प्रमोद आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेच्या कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात पार पडली. याप्रसंगी उपस्थित संचालक मंडळाला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

अध्यक्षपदाची सुचना दिलीप झाल्टे यांनी मांडली. या सूचनेस मच्छिंद्र कोळपे यांनी अनुमोदन दिले. श्रद्धांजली ठरावाचे वाचन संजय पोथारे यांनी केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आभाळे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, मा.आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतीपथावर आहे. कारखाना व उद्योग समूहाच्या कामगार सभासदांना वैयक्तिक कर्ज पुरवठा,आवश्यक सोयी सुविधा पुरवित आहे. संस्थेने ५ कोटी ९६ लाख १० हजार कर्ज वाटप केले असून त्या माध्यमातून व इतर उत्पन्नातून संस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण ३१ लाख ९० हजार रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून यावर्षी सभासदांना १०% लाभांश देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.चालू वर्षापासून कर्ज मर्यादेत वाढ करून कायम कर्मचाऱ्यांना दहा लाख व हंगामी कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपये कर्ज घेता येणार आहे. बदलत्या काळानुसार संस्थेच्या कारभारात अधिकची पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने महत्वपूर्ण पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी साखर दुकानात साखर खरेदी करतांना सभासदांना ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्यू आर कोडचे उद्घाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले व जास्त ठेव ठेवणाऱ्या व जास्तीत जास्त लाभांश घेणाऱ्या सभासदांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन मॅनेजर कुलदीप गांगुर्डे यांनी केले. सभेपुढे मांडण्यात आलेले १ ते १३ विषय सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजूर केले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, सेक्रेटरी बाबा सय्यद, कामगार सभा जनरल सेक्रेटरी नितीन गुरसळ आदी मान्यवरांसह संस्थेचे सर्व सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हा.चेअरमन वैभव काळे यांनी केले तर आभार विलास रोहमारे यांनी मानले.