मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा आ.आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना सोमवार (दि.२२) रोजी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला असून काढणीला आलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेवून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत.कोपरगाव मतदार संघातील पढेगाव, कासली, शिरसगाव, तिळवणी, तळेगाव मळे, दहेगाव, लौकी, धोत्रे, खोपडी, भोजडे आदी गावांना सोमवार (दि.२२) रोजी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला. सोमवारी मध्यरात्रीनंतर जवळपास तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने शेतीची दाणादाण उडवून दिली.

या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात साचल्यामुळे शेतातील उभी पिके ऊस, मका, कपाशी, कांदा रोप, बाजरी, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून आजपर्यंत कोपरगाव मतदार संघ या परतीच्या पावसापासून सुरक्षित होता. परंतु सोमवारी रात्री या परतीच्या पावसाने पूर्व भागातील अनेक गावांना चांगलेच झोडपले त्यामुळे या पावसाचा मुख्यत: फटका काढणीला आलेल्या बाजरी, मका, तूर, कपाशी या पिकांना बसला असून शेतातील हि पिके पाण्यात आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतात पेरणी केली होती. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी आ.आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यामुळे गोदावरी कालवे मागील दोन महिन्यापासून सातत्याने वाहते असल्यामुळे सर्वच पिके जोमात होती. काही दिवसांत या पिकांची काढणी होणारच होती मात्र झालेल्या मुसळधार पावसाने पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती समजताच आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.शेतकऱ्यांनी काळजी करू नये.आजवर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिली आहे. कोपरगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीबाबत कृषी मंत्री व मदत, पुनवर्सन मंत्री यांच्याशी संपर्क करून झालेल्या नुकसानीची माहिती देवून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.