‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कोपरगाव मतदार संघातील अनेक रस्त्यांना मान्यता-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजने अंतर्गत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची महायुती शासनाने गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव मतदार संघातील अनेक पाणंद व शेत रस्त्यांना महायुती शासनाने अखेर मान्यता दिली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून रस्त्याच्या सुविधेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी कायमच्या दूर होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु शेतातील खराब व कच्च्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्ते चिखलमय होऊन शेतांपर्यंत पोहोचणे देखील कठीण होत असे व अशा परिस्थितीत पिकांसाठी लागणारी खते शेतात घेवून जाणे व तयार झालेला शेतमाल घरी घेवून येणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे जिकीरीचे काम होते.त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाढत जावून काही वेळेस शेत मालाचे नुकसान देखील होत होते.

मतदार संघातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील अनेक गावातील पाणंद व शेत रस्त्यांना मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव दाखल करून त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील ३९ गावातील तब्बल ४३ किलोमीटरच्या शेत-पानंद रस्त्यांना महायुती शासनाने मंजुरी दिली आहे.गावा शिवारातील रस्ते, पाणंद रस्ते सुकर व्हावेत शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी या रस्त्यांची मदत व्हावी हा ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजने मागील मुख्य उद्देश आहे. याचा कोपरगाव मतदार संघातील अंचलगाव, आपेगाव, उक्कडगाव, करंजी, कान्हेगाव, कारवाडी, कासली, कुंभारी, कोकमठाण, कोळगाव-थडी, कोळपेवाडी, खिर्डी, चांदगव्हाण, चांदेकसारे, चासनळी, डाऊच बु., तिळवणी, दहेगाव बोलका, धामोरी, धोत्रे, बक्तरपुर, बहादरपूर, बोलकी, ब्राम्हणगाव, भोजडे, मंजूर, मढी बु., मल्हारवाडी,माहेगाव देशमुख, मुर्शतपुर, रांजणगाव देशमुख, लौकी, वेळापूर, शहापूर, संवत्सर, सडे, सांगवी भुसार, हंडेवाडी,वडगाव आदी गावांना या मातोश्री शेत पानंद रस्ते योजनेचा फायदा होणार असून या योजनेंतर्गत गावोगावी शेत रस्त्यांची उभारणी, मजबुतीकरण होणार आहे.कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना रस्त्याअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ योजने अंतर्गत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. ही योजना म्हणजे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप असून शेतकऱ्यांना शेतात जाणे, शेतीकामे करणे आणि शेतात तयार झालेला शेतीमाल घरी किंवा बाजारात सुरक्षितरित्या आणण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

त्यामुळे शेतीमाल वेळेत बाजारात पोहोचेल, वाहतूक खर्च कमी होईल. ही योजना केवळ रस्त्यांची नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मजबुतीची वाटचाल आहे. अशा योजनांमुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भाग समृद्ध होईल असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे. आ. आशुतोष काळेंच्या यांनी अथक पाठपुरावा करून महायुती शासनाकडून कोपरगाव मतदार संघातील अनेक पाणंद व शेत रस्त्यांना मान्यता मिळविल्याबद्दल या एकोणचाळीस गावातील शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. कित्येक दशकापासूनची अडचण दूर होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.मतदार संघातील ४३ किलोमीटरच्या शेत-पाणंद रस्त्यांना महायुती शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे.