कोपरगावात जागर स्त्री शक्तीचा नवरात्रौत्सवाचे आयोजन – पुष्पाताई काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सोमवार (दि.०२२) ते बुधवार (दि.०१) पर्यंत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी दिली आहे. दरवर्षी महिला भगिनींना आतुरता असणारा जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला दरवर्षी महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. नवरात्र म्हणजे देवीच्या नऊ रूपांची उपासना शैलपुत्रीपासून सिद्धीदात्रीपर्यंत आदिमायेचे प्रत्येक रूप महिलांना एक नवी प्रेरणा देते. धैर्य, कणखरपणा, सौंदर्य, मातृत्व, विद्वत्ता आणि शक्ती या सर्व भावनांचा हा उत्सव आहे. या उत्सवात कोपरगावातील महिला मोठ्या संख्येने एकत्र येतात. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होवून आपली कला, प्रतिभा, नेतृत्व दाखवतात.त्यामुळे जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव महिला भगिनींसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे सोमवार (दि.०२२) पासून सुरु होणारा नवरात्र उत्सव देखील दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले आहे.

यावर्षी महिलांसाठी महिलांचा आवडता ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम, भव्य दांडिया स्पर्धा तसेच अनेक नवीन स्पर्धा अशा स्पर्धां बरोबरच ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ या गायन स्पर्धेचा समावेश आहे.महिलांसाठी नवरात्र उत्सव म्हणजे एक प्रकारची शक्तीची साक्षात अनुभूती, स्त्रीशक्तीचा जागर, आनंदाचा उत्सव, आणि उत्साहाने भरलेले क्षण. अशा वातावरणात दांडियासारख्या पारंपरिक नृत्यप्रकारांमधून महिलांना स्वतःला व्यक्त करता येते आणि सामूहिकरीत्या साजरे करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांमुळे महिला भगिनींचे मनोबलही वाढते. दैनंदिन धार्मिक कार्यक्रमाबरोबरच अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, नाविन्यपूर्ण उपवासाचे पदार्थ तयार करण्याची स्पर्धा तसेच नवरात्रीच्या नऊ दिवस कुंकुमआर्चन, देवीचे पाठ, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. महिलांचा सर्वात आवडता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमा बरोबरच अनेक स्पर्धांमध्ये महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. विविध बक्षिसे मिळवीण्याची संधी या “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिला भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले आहे.

समाजात स्त्रीचा सन्मान, तिचे योगदान आणि तिच्या कला, नेतृत्व, साहस व कर्तृत्वाचे दर्शन घडवण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी साजरा करण्यात येणारा “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव प्रभावी व्यासपीठ ठरले आहे. स्त्री ही सृष्टीची जननी आहे तिच्यात असलेल्या अपार शक्तीचा जागर करूनच समाजात खरी प्रगती शक्य आहे. अशा उपक्रमांतून महिलांना आत्मविश्वास मिळतो आणि त्यांच्या नेतृत्वाला चालना मिळते.दांडिया आणि गरबा हे नृत्यप्रकार केवळ सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक नसून, त्या निमित्ताने महिला भगिनींना मैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची, आरोग्यपूर्ण शारीरिक हालचाल करण्याची आणि सामाजिक संवाद वाढवण्याची संधी मिळते. “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सवात आध्यात्मिक उन्नती सोबतच सामूहिक आनंद आणि शक्तीची अनुभूती घेवून आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी. आपल्या आनंदाचा, उत्साहाचा आणि ऊर्जा रूपी ‘शक्तीचा’ जल्लोष साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले आहे.