संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या एक राखी जवानांसाठी उपक्रमाने सीमेवरील सैनिक भावूक

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
देशभक्ती आणि भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला अभिवादन करत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून “एक राखी जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत सव्वा लाख राख्यांचा संकल्प घेऊन शिर्डीहून श्रीनगरकडे ऐतिहासिक यात्रेचा केलेला प्रवास अतिशय भावनिक ठरला.जम्मूश्रीनगर येथे सैनिकांसोबत झालेले रक्षाबंधन,आणि प्रत्येक राखी सोबत देशातील विविध राज्यातील बहिणींचे आपुलकीचे संदेश यामुळे सैनिकांना हे रक्षाबंधन भावनिक झाले. रक्षाबंधन सोहळा सुरू असताना अनेक सैनिक भावूक झालेले बघायला मिळाले. सीमावर्ती भागात सुरू असलेल्या ऑपरेशन अखल काळात देखील युवकांच्या या यात्रेने प्रवास करून आम्हाला बहिणींनी दिलेल्या या राख्या सुखरूप सुपूर्द केल्या.यातून अतिशय ऊर्जा मिळाली आहे ज्यामुळे आम्ही शत्रूशी लढताना देश आमच्या प्रत्येक क्षणाला सोबत आहे हे अनुभवायला मिळाले अशी भावनिक प्रतिक्रिया तेथील सैनिकांनी व्यक्त केली आहे.जम्मू येथे पोहोचलेल्या संजीवनी युवा सेवकांचे भारतीय सैनिक बांधवांनी उत्साहाने स्वागत केले.
सीमावर्ती भागात भारतीय सैन्याचे अतिशय जोखमीचे ऑपरेशन अखल सुरू असताना देखील ही राष्ट्रप्रेमाची यात्रा घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक या संवेदनशील काळात सैनिकांसाठी राख्या घेऊन पोहोचल्याने सैनिकांनी त्यांचे धाडसाचे कौतुक केले.
रक्षाबंधनाचा पवित्र सोहळा थेट सीमेवर साजरा करताना सैनिकांच्या डोळ्यांत आपुलकीचे अश्रू होते. अनेक सैनिकांनी या प्रसंगी सिंदूर ऑपरेशन दरम्यान राबवलेल्या यशस्वी योजना आणि त्या काळातील थरारक क्षणांची आठवण सांगितली. या संवादात देशसेवेतील त्याग, शौर्य आणि संकटांचा भावनिक पट उलगडला. सैनिकांच्या जीवनात राष्ट्र सुरक्षा करताना त्यांना सण उत्सवाला कुटुंबासमवेत वेळ मिळत नाही यामुळे रक्षाबंधनासारखा महत्त्वाचा सण साजरा करण्यासाठी झालेली ही यात्रा अतिशय कौतुकाची आणि अभिमानाची ठरली.सीमेवर तैनात वीर जवानांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे त्यांना देशभरातील बहिणींच्या प्रेमाचा स्पर्श अनुभवता आला. विविध शहरातील बहिणी आणि विद्यार्थिनींनी प्रेमाने तयार केलेल्या राख्या थेट त्यांच्या मनगटावर बांधल्या गेल्या.

सैनिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, या राख्या आम्हाला नव्या जोमाने देशरक्षणाची ताकद देतात असे सांगितले.या यात्रेदरम्यान हजारो नागरिकांचे प्रेम मिळालेला “राखी रथ” हा सैनिकांप्रती राष्ट्र प्रेमाची ऊर्जा वाढवणारा ठरला. युवा सेवक सीमारेषेवर तैनात शूर सैनिकांसाठी प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेचा अमूल्य ठेवा घेऊन रवाना झाले. यंदा या उपक्रमाची व्याप्ती वाढवत, एक लाखाहून अधिक राख्या संकलित करून तब्बल २,२०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. साईबाबांच्या पावन भूमी शिर्डीहून निघालेला हा राखी रथ सात राज्यातून कोपरगाव, येवला, मनमाड, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा, इंदोर, ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा, अंबाला, अमृतसर, पठाणकोट, कठूआ,जम्मू, उधमपूर,श्रीनगर असा प्रवास करून सैनिक बांधवांना या राख्या सुपूर्द केल्या.गेल्या पाच वर्षांपासून संजीवनी युवा प्रतिष्ठानची ही अनोखी परंपरा देशभक्ती, भावनिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दृढ करत आहे. प्रवासादरम्यान शेकडो ठिकाणी रक्षा रथाचे पुष्पवृष्टीने स्वागत झाले असून, ही यात्रा फक्त एक सामाजिक उपक्रम नसून देशाच्या शूर जवानांप्रती प्रेम, सन्मान आणि कृतज्ञतेची एक आदर्श गाथा ठरली आहे.