एक राखी जवानांसाठी – संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सव्वा लाख राख्यांसह सैनिकांसोबत केले रक्षाबंधन साजरे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
देशभक्ती आणि भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला सलाम करत, कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानने विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली “एक राखी जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत सव्वा लाख राख्यांचा संकल्प घेऊन, ४ ऑगस्ट रोजी शिर्डीहून श्रीनगरकडे ऐतिहासिक यात्रेचा शुभारंभ केला होता. हा अद्वितीय “राखी रथ” मधून संजीवनी युवा सेवक सीमारेषेवर तैनात शूर सैनिकांसाठी राख्यांचा अमूल्य ठेवा घेऊन रवाना झाले आहेत त्यांनी दिल्ली येथे सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे केले.रक्षाबंधनाला दिल्ली येथील सैनिक ट्रांझिट कॅम्पमध्ये या रक्षा रथाचे सैनिक बांधवांनी मनःपूर्वक स्वागत केले. सैनिकांनी राखी रथाला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आणि रक्षाबंधनाचा हा पवित्र सण तेथेच राखी बांधून साजरा केला. भावना आणि उत्साहाने भरलेला हा क्षण सर्वांच्या हृदयात देशभक्ती आणि बंधुभावाची ज्वाला अधिक प्रखर करणारा ठरला.सैनिकांना रक्षाबंधन साजरे करताना अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. सीमेवरती देश रक्षणासाठी तैनात असणाऱ्या वीर जवानांना सण उत्सवाला आपल्या कुटुंबासमवेत वेळ देता येत नाही. मात्र संजीवनी युवा प्रतिष्ठानने रक्षाबंधनाचा स्तुत्य उपक्रम राबविल्याने सैनिकांनी अतिशय कौतुक करत आपुलकीने राख यांचा स्वीकार केला व या उपक्रमाला धन्यवाद दिले.विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था गेली दहा वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून सतत समाजसेवा करत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून रक्षाबंधनाच्या निमित्ताने संस्थेची एक विशेष परंपरा आहे. सीमावर्ती भागात तैनात भारतीय सैनिकांना स्वतः जाऊन राखी बांधण्याची.विविध शहरातील बहिणी आणि विद्यार्थिनींनी प्रेमपूर्वक तयार केलेल्या राख्या दरवर्षी संकलित करून युवा सेवक थेट सीमारेषेवर पोहोचवतात, ज्यातून देशभक्ती, भावनिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश अधिक दृढ होतो.यंदा या राखी उपक्रमाची व्याप्ती वाढली असून, एक लाखाहून अधिक राख्या संकलित करून तब्बल २,२०० किलोमीटरचा प्रवास केला जात आहे. साईबाबांच्या पावन भूमी शिर्डीहून निघालेला हा राखी रथ कोपरगाव, येवला, मनमाड, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा, इंदोर,ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा, दिल्ली, अंबाला, अमृतसर, पठाणकोट, जम्मू, उधमपूर मार्गे श्रीनगर येथे पोहचून रक्षाबंधन समारोह साजरा करून भव्य समारोप होईल.या यात्रेदरम्यान शेकडो ठिकाणी रक्षा रथाचे पुष्पवृष्टीने स्वागत केले जात आहे. ही फक्त एक यात्रा नसून, देशाच्या शूर जवानांप्रती प्रेम, सन्मान आणि कृतज्ञतेची एक अमर गाथा आहे.