केंद्रीय रस्ते निधीतुन झगडे फाटा ते तळेगाव फाटा (रा.मा. ६५) रस्त्याला निधी द्या आ.आशुतोष काळेंनी घेतली केंद्रीय मंत्री ना.गडकरींची भेट

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा व सातत्याने प्रमाणापेक्षा जास्त अवजड वाहतुकीचा भार सोसणाऱ्या झगडे फाटा ते तळेगाव फाटा (रा.मा. ६५) या जवळपास १७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते निधीतून निधी द्या अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांना पहिल्याच पंचवार्षिक मध्ये तीन हजार कोटीच्यावर निधी दिला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी ते आ.आशुतोष काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत.त्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार आहेत व एखादा प्रश्न हाती घेतला तर तो प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कसा आणि किती पाठपुरावा करायचा याचे उदाहरण आ.आशुतोष काळे आहेत. त्यामुळे झगडे फाटा ते तळेगाव फाटा (रा.मा.६५) या रस्त्याचा प्रश्न सोडविल्याशिवाय आ.आशुतोष काळे स्वस्थ बसणार नाहीत हे ते करीत असलेल्या पाठपुराव्यातून दिसून येत आहे.
व यासाठी स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी पुढाकार घेतला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.कोपरगाव तालुक्यातील राज्य मार्ग ६५ च्या झगडे फाटा ते तळेगाव फाटा हा रस्ता अत्यंत खराब झालेला होता. आ.आशुतोष काळे यांनी झगडे फाटा ते कोपरगाव तालुका हद्दीपर्यंत या रस्त्यासाठी आणलेल्या दहा कोटी निधीतून या रस्त्याची दुरुस्तीही करण्यात आली होती. परंतु कोपरगाव मतदार संघाच्या लगतच जगप्रसिद्ध शिर्डीचे श्री साईबाबा देवस्थान असून या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रम व उत्सव सुरु असतात. त्या उत्सवा वेळी एन.एच.७५२ जी वरून शिर्डीकडे जाणारी वाहतूक पुणतांबा फाटा मार्गे याच झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता अर्थात राज्यमार्ग ६५ वरून मागील अनेक वर्षापासून वळविली जाते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असून या रस्त्याची वारंवार दुरुस्ती करूनही हा रस्ता खराब होत आहे.याबाबत आ.आशुतोष काळे यांनी मागील महिन्यात पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न सोडवायचा या उद्देशातून त्यांनी शुक्रवार (दि.०८) रोजी पुन्हा एकदा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. नागरीकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेवून या रस्त्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली असता त्याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यावेळी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी देखील रस्त्याच्या दुरुस्तीबाबतचे दिलेले पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांना दिले. त्या पत्रात तळेगाव फाटा ते झगडे फाटा हा राज्यमार्ग ६५ मार्गे जाणारा रस्ता हा त्या भागातील एक महत्त्वाचा मार्ग असून तो जवळपास २५ ते ३० गावांना जोडतो. वाहतूक, स्थानिक प्रवास आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग एक महत्त्वाचा दुवा आहे. सध्या, या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे, ज्यामुळे नागरीकाची गैरसोय होत असून या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे.या रस्त्याचे महत्त्व आणि दुरुस्ती आणि दर्जोन्नतीची गरज लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत आवश्यक निधी लवकरात लवकर मंजूर करावा असे म्हटले आहे.त्यामुळे लवकरच या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी व आ.आशुतोष काळे यांच्या झालेल्या भेटीवरून दिसून येत आहे.