विकासकामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरिकांची देखील जबाबदारी -आ.आशुतोष काळे
कोपरगाव शहरात दीड कोटीच्या विकास कामांना प्रारंभ

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सर्वसामान्य नागरिकांच्या कर रूपाने शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा म्हणजेच हा निधी आहे. त्यामुळे त्या निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. विकासकामांसाठी वारंवार निधी मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजे व हि विकासकामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरीकांची देखील जबाबदारी असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.कोपरगाव शहरात विविध योजनांच्या अंतर्गत प्रभाग क्र.०१ मध्ये साई सिटी ते शांतीनगर चर ते आहेर घर सी.डी. वर्कसह रस्ता करणे (५० लक्ष), गिरमे घर ते कोपरे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे (२० लक्ष) व कृष्णा आवारे घर ते गुंजाळ घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (३० लक्ष), प्रभाग क्र. ९ मध्ये गुलमोहर कॉलनी अंतर्गत रस्ता करणे (३० लक्ष) व प्रभाग क्र. १४ मध्ये गजानननगर-गोरोबानगर रस्त्यावरील सी.डी. वर्क करणे (२५ लक्ष) अशा एकूण १.५५ कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरात रु.१.५५ कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करतांना समाधान वाटत आहे. या विकास कामांना मागील वर्षीच मंजुरी मिळाली होती परंतु निवडणूक कार्यक्रम असल्यामुळे या कामांना निधी मिळण्यास काहीसा उशीर होवून कामे सुरु होण्यास देखील उशीर झाला मात्र यापुढे पुन्हा नियमितपणे विकासकामे सुरु राहतील.यापुढील काळात कोपरगावच्या विकासासाठी अजून निधी मंजूर करून आणण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.

शहराच्या प्रत्येक भागाचा समतोल विकास व्हावा, नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात हे माझं ध्येय असून शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी मी कटिबद्ध आहे.त्यामुळे होणाऱ्या विकास कामांचा दर्जा गुणवत्तापूर्ण असावा. कामाच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड चालणार नाही. नागरीकांनी देखील सुरु असलेल्या विकासकामात हलगर्जीपणा होत असेल तर माझ्याशी संपर्क करावा. विकासकामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरीकांची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही देखील सुरु असलेल्या विकासकामांवर लक्ष ठेवा. नागरिकांच्या गरजा ओळखून विविध विकासकामांना सुरुवात होत आहे. पुढील काळातही अशाच प्रकारे विकासकामे करून कोपरगावला एक आधुनिक व सुविधायुक्त शहर बनवण्याचा माझा प्रयत्न सुरूच राहील असे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रभागातील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कामांना आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून मुहूर्त लागल्यामुळे नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.